वन विभाग क्रीडा स्पर्धांचे सर्वसाधारण विजेतेपद मेवासी वन विभागाला
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते पारितोषिक वितरण
स्पर्धेत नाशिक वनविभागाच्या ४०० खेळाडूंचा सहभाग
जळगाव, दि.३१ डिसेंबर जळगाव वन विभागामार्फत आयोजित धुळे वनवृत्तस्तरीय क्रीडा स्पर्धा “वन चेतना २०२३-२४” चे सर्वसाधारण विजेतेपद मेवासी वन विभाग (नंदुरबार) यांनी पटकावले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जळगाव वन विभागाचे वनउपसंरक्षक प्रविण ए यांच्या हस्ते आज संपन्न झाला.
या क्रीडा स्पर्धा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात २९, ३० व ३१ डिसेंबर २०२३ रोजी येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेचे उद्घाटन नाशिकचे मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील चारशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत १०० मी, ४०० मी, ८०० मी धावणे, ४०० मी व ८०० मी जलद चालणे, थाळी फेक, गोळा फेक, भाला फेक, लांब उडी, १०० × ४ रिले, क्रिकेट, हॉलीबॉल, कबड्डी, बॅडमिंटन, बुद्धीबळ, कॅरम, रस्सीखेच आदी स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत धुळे उपवनसंरक्षक , मेवासी उपवनसंरक्षक , नंदुरबार उपवनसंरक्षक , जळगाव उपवनसंरक्षक, यावल उपवनसंरक्षकचे संघ सहभागी झाले.
या क्रीडा स्पर्धेचा समारोप समारंभ आज, ३१ डिसेंबर रोजी पार पडला. स्पर्धेतील सर्वोत्तम पुरुष खेळाडू कुलदीपसिंग किरणसिंग राजपूत (धुळे वन विभाग) व स्पर्धेतील सर्वोत्तम महिला खेळाडू प्रियंका जेकमसिंग वसावे (मेवासी वन विभाग) ठरले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपवनसंरक्षक प्रविण ए यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पदक वितरण करण्यात आले.
स्पर्धेचे नियोजन उपवनसंरक्षक प्रवीण ए यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक सुदर्शन शिसव व जळगाव उपवनसंरक्षक अधिकारी – कर्मचाऱ्यांनी केले.