गांधी विचारातच मिळतील सर्व प्रश्नांची उत्तरे – मा. आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केला विश्वास

गांधी विचारातच मिळतील सर्व प्रश्नांची उत्तरे
– मा. आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केला विश्वास
– भारताची समाज व्यवस्था बदलण्याची गरज

प्रतिनिधी,

आज देशात अत्यंत बिकट परिस्थिती असून अनेक आव्हानांना तोंड द्याव लागतं आहे. प्रत्येक आव्हानाला आणि प्रत्येक प्रश्नाला गांधी विचार हेच उत्तर आहे, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे. जयहिंद लोकचळवळ या संस्थेतर्फे आयोजित केलेल्या जागतिक परिषदेचेच्या दुसऱ्या दिवशी ते बोलत होते.

आपल्याकडील समाज व्यवस्था ही विषमतेवर आधारित होती. हिंदू धर्मात सुरुवातीला जाती व्यवस्था नव्हती. तर एका वर्गाने ती तयार केली. यामुळे एका समाजावर मोठी बंधने आली. आपण बंदिस्त व्यवस्था तयार केल्या. डॉ. बाबासाहेबांएवढा शिकलेला मोठा राजकारणी अपवादानेच आपल्याकडे झाला. डॉ. बाबासाहेबांना सुध्दा शिक्षणाची संधी मिळाली नसती. तर त्यांच्यातला प्रगल्भ व बुद्धिमान नेता घडला नसता, ही शिक्षणाची ताकद आहे. भारताच्या हजार वर्षांच्या इतिहासात ८०० वर्ष भारत हा गुलामगिरीत होता. याला भारताची समाज व्यवस्थाच कारणीभूत आहे, असेही डॉ. सुधीर तांबे म्हणाले.

पूर्वापार चालत आलेली बंदिस्त समाज व्यवस्था पुन्हा चालू करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. मनुस्मृती लागू करावी, असे एका जबाबदार व्यक्तीने विधान केले होते. हे आपण नेमकं समजून घेतलं पाहिजे. त्यातूनच आपण या सगळ्यांना विरोध करण्याची ताकद आपल्या अंगी बाणवली पाहिजे. स्वतःला सक्षम केले पाहिजे. जयहिंद लोकचळवळ ही स्वतःला सक्षम करण्याचा एक मार्ग आहे. शिक्षण, शेती, आरोग्य, क्रीडा आणि साहित्य या सर्वांचा विकास होण्यासाठी आम्ही झटत आहोत, असेही डॉ. सुधीर तांबे म्हणाले.

पुरोगामी म्हणजे कोण?
जो समाजाला पुढे नेतो, तो पुरोगामी. जो समाजाला पाठीमागे नेतो तो प्रतिगामी अशी साधी आणि सोपी व्याख्या डॉ. सुधीर तांबे यांनी सांगितली. आज देशात प्रतिगामी शक्ती वाढत आहे. या शक्तीचा सामना कोण करणार आणि कसं करणारं? हा प्रश्न देखील आपल्या समोर आहे. या प्रश्नाचं उत्तर म्हणूनच जयहिंद लोकचळवळ काम करत आहे. जयहिंद लोकचळवळ एक सुदृढ समाज घडविण्यासाठी कार्यरत असून गांधी विचार हेच या चळवळीमागची प्रेरणा असल्याचेही ते यावेळी म्हणाले.