गुरूगौरव पुरस्कार मोठ्या पुरस्काराची पायाभरणी ठरावा!
– आ. तांबेंनी शिक्षकांच्या कार्याचे केले कौतुक
– शिक्षक दिनाचे औचित्य साधून ‘गुरूगौरव गौरव शिक्षकांचा’ पुरस्कार सोहळा
प्रतिनिधी,
भुसावळ – तुम्ही शिक्षकांनी केलेल्या चांगल्या कामाची दखल घेऊन तुम्हाला हा पुरस्कार देण्यात आला आहे. यापुढेही तुम्ही अशाच पध्दतीने काम करावं. हा पुरस्कार पुढच्या मोठ्या पुरस्काराची पायाभरणी ठरावी. पुढे पुढे आपली राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत मजल जावी, असे प्रतिपादन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले.
भुसावळ येथील नाहाटा विद्यालयातील वाचन कक्षात नुकताच शिक्षक दिनानिमित्त ‘गुरूगौरव सत्कार समारंभ – २०२३’ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आ. सत्यजीत तांबे बोलत होते.
आ. तांबे पुढे म्हणाले की, ज्या शिक्षकांना पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी निश्चितच त्यांच्या नोकरीमध्ये, कार्यामध्ये काहीतरी असं कामं केलेलं असणार. ते काम बघूनचं संयोजकांनी आणि आयोजकांनी शिक्षकांना पुरस्कार दिलेला आहे. समोरचा मुलगा पुढील आयुष्यात मोठा माणूस झाला पाहिजे, अशी भावना प्रत्येक शिक्षकाच्या मनात असते. असा यशस्वी झालेला विद्यार्थी जेव्हा त्याच्या शिक्षकांना भेटतो, तेव्हा ती त्यांच्यासाठी त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची पोचपावती असते, असंही आ. तांबे म्हणाले.
याप्रसंगी, संजय भाऊ सावकारे, आमदार, भुसावळ विधानसभा क्षेत्र, उद्य पाटील, चेअरमन ग. स. सोसायटी, मोहन फालक, अध्यक्ष, ताप्ती एज्युकेशन सोसायटी, रागिणी चव्हाण, उप.शिक्षणाधिकारी, मनोज बियाणी, चेअरमन, बियाणी एज्यु. आदींनी उपस्थिती होती.
… आणि शिक्षकांचा ऊर अभिमानाने भरून आला
या वेळी आ. तांबे यांनी त्यांची एक आठवणही सांगितली. ते म्हणाले की, गेल्या वर्षी ते आणि त्यांचे शाळेतले वर्गमित्र त्यांच्या शिक्षकांच्या घरी भेटायला गेले होते. या शिक्षकांपैकी काही जण निवृत्त झाले होते. पण आपल्या या यशस्वी विद्यार्थ्यांना भेटून त्यांना अत्यानंद झाला. एवढ्या वर्षांनीही आपले विद्यार्थी आपल्याला विसरले नाहीत. एवढंच नाही, तर आज विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी उत्तम नाव कमावलं आहे, हे पाहून त्या शिक्षकांचा ऊर अभिमानाने भरून आला होता, असंही आ. तांबे यांनी आवर्जून सांगितलं.
…………………………….