नागरी दलीत वस्ती सुधार योजनेतंर्गत
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना 31.61 कोटींच्या
निधी वितरणास पालकमंत्र्यांची मान्यता
जळगाव, दि. 28 – अनुसूचित जाती उपयोजना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका/ नगरपंचायतींसाठी (नागरी स्थानिक स्वराज्य संस्था) सन 2021-22 मधील प्रस्तावित 31.61 कोटी रुपयांच्या निधी वितरणास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात समितीची जिल्हास्तरीय बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. या बैठकीस आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरपालिका) सतीश दिघे यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तर जिल्ह्यातील नगरपालिकांचे मुख्याधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्तीत सुविधा पुरविण्यासाठी जळगव शहर महानगरपालिकेस 5 कोटी रुपयांचा तर जिल्ह्यातील 18 नगरपालिका/नगरपंचायतींना 26.61 कोटी रुपये असा एकूण 31.31 कोटी रुपयांचा निधी अनुसूचित जाती उपयोजनेतून मंजूर झाला आहे.
त्यानुसार भुसावळ नगरपालिकेस 8 कोटी 95 लाख, अमळनेर 2 कोटी 25 लाख, चाळीसगाव 3 कोटी 20 लाख, चोपडा 1 कोटी 70 लाख, पाचोरा 1 कोटी 85 लाख, जामनेर 1 कोटी 15 लाख, पारोळा 52 लाख, धरणगाव 62 लाख, एरंडोल 65 लाख, यावल 85 लाख, रावेर 65 लाख, फैजपूर 53 लाख, भडगाव 60 लाख, वरणगाव 1 कोटी 15 लाख, बोदवड नगरपंचायत 65 लाख, मुक्ताईनगर नगरपंचायत 80 लाख, शेंदूर्णी नवनिर्मित नगरपंचायत 49 लाख 91 हजार 225 रुपये असा एकूण 26 कोटी 61 लाख 91 हजार 225 रुपयांचा निधी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामधील अनुसूचित जाती लोकसंख्येच्या प्रमाणातवितरीत करण्यास आजच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे.या निधीतून नागरी क्षेत्रात नागरीकांसाठी चांगल्या दर्जाच्या मुलभूत सोयीसुविधा उभारण्याच्या सूचनांही पालकमंत्र्यांनी बैठकीत दिल्यात.
जळगाव शहरात 4 कोटी 17 लाखांच्या कामास मान्यता
महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोईसुविधांच्या विकास योजनेत जळगाव शहर महानगरपालिकेस सन 2016-17 या वर्षात प्राप्त झालेल्या 25 कोटी रुपयांच्या अनुदानातून शिल्लक राहिलेल्या 4.17 कोटी रुपयांच्या अनुदानातून महासभा ठराव क्र. 365 दि. 3 फेब्रुवारी, 2021 व महासभा ठराव क्र. 488, दि. 15 मे, 2021 नुसार नवीन विकास कामे प्रस्तावित केलेली आहेत. यात वार्ड क्रं. 19 अंतर्गत येत असलेल्या सुप्रिम कॉलनीत व आजुबाजुच्या परिसरात अस्तित्वात असलेल्या पोलांवर स्ट्रिट लाईट फेज वायर ओढून पथदिव्याची व्यवस्था करणे, जळगाव शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूलाच्या (रेल्वे लेव्हल क्रॉसिंग 420 -9/11) जोडरस्त्याच्या संरेखेच्या मार्गातील उच्चदाब/लघुदाब वीज वाहिनी स्थलांतरीत करणे, प्रभाग क्र. 2 कांचन नगर, चौघुले प्लॉट परिसरातील रस्ते डांबरीकरण करणे, जळगाव शहरात आवश्यक ठिकाणी स्त्री व पुरुषांकरीता स्वच्छतागृह/ युरिनल्सची व्यवस्था करणे, डी मार्ट ते रामेश्वर कॉलनीतील आदित्य चौक पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे, पिंप्राळा स्मशानभुमी सुशोभीकरण करुन विकसित करणे, प्रभाग क्र. 12 मधील रामदास कॉलनी ओपनस्पेस येथे संरक्षण भिंत बांधणे आदि कामांना आजच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी मान्यता दिली.