पाचोरा येथे बाळासाहेब ठाकरे मीडिया कक्षाचे लोकार्पण
वैशालीताई सूर्यवंशी यांची स्वातंत्र्यदिनी अनोखी भेट, पत्रकार सुखावले
पाचोरा येथे गेल्या अनेक वर्षांपासून असलेली मीडिया कक्षाची मागणी उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी स्वातंत्र्यदिनी पूर्णत्वास आणली असून त्यांनी स्वखर्चाने उभारलेल्या बाळासाहेब ठाकरे मीडिया कक्षाचे लोकार्पण स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर करण्यात आले. यामुळे पत्रकार कमालीचे सुखावले आहेत.
पाचोरा येथे विविध संस्था, संघटनांची पत्रकार परिषद, मीडिया प्रतिनिधींच्या बैठका ,चर्चा विनिमय यासाठी हक्काचे पत्रकार कक्ष असावे अशी मागणी विविध पत्रकार संघटनांच्या वतीने करण्यात येत होती. माजी आमदार स्व आर ओ तात्या पाटील यांनी पत्रकार कक्षाची मागणी पूर्ण करण्याचे आश्वस्त केले होते .परंतु दरम्यानच्या काळात त्यांचे अकाली निधन झाल्याने त्यांचे हे आश्वासन व स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार त्यांच्या कन्या उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी केला होता. त्या आधारे त्यांनी शहराच्या मध्यवर्ती भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात असलेल्या शिवतीर्थ या शिवसेना कार्यालया शेजारी स्वतःच्या जागेत स्व खर्चाने पत्रकार कक्ष उभारून त्यात टेबल, खुर्च्या ,पंखे ,लाईट व आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची भले मोठी प्रतिमा असलेले पत्रकार कक्ष उभारले. या पत्रकार कक्षास बाळासाहेब ठाकरे मीडिया कक्ष असे नाव देण्यात आले असून त्याचे लोकार्पण 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार प्रा सी एन चौधरी ,विनायक दिवटे यांच्या हस्ते फीत कापून तसेच बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून हे मीडिया कक्ष लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी वैशालीताई सूर्यवंशी, जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, अँड अभय पाटील, तालुकाप्रमुख शरद पाटील, माजी नगरसेवक खंडू सोनवणे, धरमसिंग पाटील, नाना वाघ ,पत्रकार लक्ष्मण सूर्यवंशी ,मिलिंद सोनवणे, राहुल महाजन ,प्रशांत येवले, निखिल मोर ,संजय पाटील ,अनिल येवले, विजय पाटील, गणेश शिंदे, राकेश सुतार, प्रमोद पाटील, नरसिंग भुरे, चंचल सोनार, गौरी सोनार यांचेसह शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वैशाली सूर्यवंशी यांनी स्व.आर ओ तात्या पाटील यांचे पूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा मनस्वी आनंद असल्याची भावना व्यक्त केली व पत्रकारांच्या मदत व सहकार्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. अॅड अभय पाटील,प्रा सी एन चौधरी, मिलिंद सोनवणे यांनी मते मांडली. याप्रसंगी विविध विषयां संदर्भात अल्पोपहारासह आयोजित चर्चासत्र चांगलेच रंगले . उपस्थित सर्व पत्रकारांना वैशाली सूर्यवंशी यांनी डायरी व पेन देऊन सन्मानित केले. अॅड अभय पाटील यांनी प्रास्ताविक केले. नाना वाघ यांनी सूत्रसंचालन केले, मिलिंद सोनवणे यांनी आभार मानले.