सामाजिक न्याय पर्व’ अंतर्गत जळगाव जिल्ह्यात 7 हजार 859 विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वाटप
जळगाव दि. 19 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 1 ते 30 एप्रिल, 2023 या कालावधीत सामाजिक न्याय पर्व हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी या कालावधीत जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र समितीच्यावतीने विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशात नारनवरे व बार्टीचे महासंचालक सुनिल वारे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेत जळगाव जिल्ह्यातील 7 हजार 859 विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव बी. यु. खरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
या विशेष मोहिमेमध्ये जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून 2 हजार 918 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन निर्गमित करण्यात आले तर जळगाव जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी यांचेकडून 4 हजार 941 जात दाखले निर्गमित करण्यात आले.
ज्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग या विद्यार्थ्यांना सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात अभियांत्रीकी, वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, वास्तुशास्त्र, फार्मसी, विधी इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रम आरक्षित जागेवर प्रवेश घ्यावयाचा आहे. व त्यांनी अद्याप जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज ऑनलाइन भरलेले नाहीत. अशा सर्व विद्यार्थ्यांनी त्याचेही जात प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाईन अर्ज https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सर्व मुळ कागदपत्रे अपलोड करुन ते अर्ज अपलोड केलेल्या मुळ कागदपत्रांच्या सत्यप्रतींसह (Hard Copy) जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या नागरी सुविधा केंद्र येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत स्वत: किंवा वडिल/भाऊ/बहिण/आई यांनी समक्ष जमा करावेत. जेणेकरून त्याचे प्रकरणांवर समितीस वेळेत निर्णय घेता येतील.
*दलालापासून सावध राहण्याचे आवाहन*
अर्जदारांनी अर्ज भरतांना स्वत:चा ईमेल व मोबाईल क्रमाकांव्दारेच अर्ज नोंदणी करावा. सर्व मूळ कागदपत्र अपलोड करण्यात यावीत व आपला युझर आयडी व पासवर्ड व्यवस्थित जतन करुन ठेवण्यात यावा. समितीने त्यांचे प्रकरणावर निर्णय घेतल्यानंतर निर्णय/ जात वैधता प्रमाणपत्र हे त्यांनी नोंदणी केलेल्या ईमेलवर प्राप्त होत असते. त्यामुळे कोणत्याही अर्जदाराने त्रयस्थ व्यक्तीकडे संपर्क करु नये व त्रयस्थ व्यक्तीच्या अमिशास बळी पडू नये. अशा त्रयस्थ व्यक्तीकडून नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे अर्जदारांनी आपले अर्ज स्वतः व्यवस्थितरित्या परिपूर्ण सादर करावे. अन्य कोणत्याही कार्यालयाबाहेरील व्यक्तीशी संपर्क करू नये. असे आवाहनही श्री. खरे, सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.