पीएम किसान योजनेच्या लाभासाठी बँक खाते आधार संलग्न करून ईकेवासी करण्याचे आवाहन
जळगाव, दिनांक 4 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत लाभार्थ्यांना योजनेचा लाभ यापुढे आधार क्रमांकास जोडलेल्या बँक खात्यामध्येच जमा होणार आहे. लाभार्थ्याचे बँक खाते आधारशी संलग्न नसेल तर अशा लाभार्थ्यांना योजनेचा 14 वा हप्ता वितरणापूर्वी त्यांचे बँक खाते आधार संलग्न करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. बँक खाते आधार क्रमांकास संलग्न करणेसाठी लाभार्थ्यांनी व्यक्तीशः संबंधित बँकेत जाऊन स्वतःचे बँक खाते आधार संलग्न करून घ्यावे. असे आवाहन रविंद्र भारदे, नोडल अधिकारी पीएम किसान योजना तथा निवासी उपजिल्हाधिकारी, जळगांव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही ईकेवायसी केलेली नसेल अशा पात्र लाभार्थ्यांनी तात्काळ आपले ईकेवायसी प्रमाणीकरण पुर्ण करुन घ्यावे. पीएम किसान पोर्टलच्या https://pekisan.gov.in या वेबसाईटवरील Farmer Corner मधील ईकेवायसी या टॅब मधून ओटीपीद्वारे स्वतः लाभार्थ्यांना मोफत करता येईल. तसेच लाभार्थ्यांना ग्राहक सेवा केंद्रावरुन (CSC) सुध्दा बायोमॅट्रिक पध्दतीने ईकेवायसी प्रमाणीकरण करता येईल. केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्र (CSC) केंद्रावर बायोमेट्रिक पध्दतीने ईकेवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी प्रती लाभार्थी प्रमाणीकरण शुल्क रुपये 15/- निश्चित करण्यात आले आहे.
तरी केंद्र शासनाकडून पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता वितरणापूर्वी आधारशी बँक खाते संलग्न करणे बाकी असलेल्या लाभार्थ्यांनी आपले बँक खाते आधारशी संलग्न करुन घ्यावे. तसेच ईकेवायसी न केलेल्या प्रलंबित लाभार्थ्यांनी त्वरीत आपले ईकेवायसी प्रमाणीकरुन करुन घ्यावे. असेही श्री. भारदे यांनी कळविले आहे.