पीएम किसान योजनेचा लाभ गावातील पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 12 फेब्रुवारीपर्यंत खाते उघडण्यासाठी विशेष मोहिम
जळगाव, प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास तीन हप्त्यात रु. 2 हजार याप्रमाणे वर्षाला 6 हजार रुपये अनुदान देण्यात येते. या योजनेचा तेरावा हप्ता जमा करण्याची कार्यवाही सध्या सुरु आहे. त्याचा लाभ मिळणेसाठी लाभार्थींनी बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक आहे. यासाठी पोस्टमनच्या माध्यमातून गावातच सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
राज्यात सद्यस्थितीत 14 लाख 32 हजार लाभार्थींची बँक खाती आधार क्रमांकास जोडलेली नाही. यात जळगाव जिल्ह्यातील 37 हजार 880 लाभार्थ्यांचा समावेश आहे. त्यामुळे या लाभार्थींच्या खात्यात तेराव्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही. तरी लाभार्थींनी त्यांचे बँक खाते IPPB मार्फत उघडण्याची व ते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्टमास्तर यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी आपले आधार कार्ड व मोबाईल क्रमांक आवश्यक असणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) तर्फे गावात येऊन सदरील सेवा देण्यात येणार आहे. यासोबतच ज्यांचे खाते उघडले गेलेले नाही, त्यांचे खातेही उघडून देण्यात येणार आहेत. ते बँक खाते आधार क्रमांकाशी 48 तासात जोडले जाईल.
1 ते 12 फेब्रुवारी दरम्यान राज्यात मोहिम
पीएम किसान योजेनेतील प्रलंबित लाभार्थींची बँक खाते IPPB मध्ये उघडून ती आधार क्रमांकास जोडण्यासाठी राज्याच्या IPPB कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचप्रमाणे गावातील पोस्टमास्तर या लाभार्थींना संपर्क करून IPPB मध्ये बँक खाती सुरु करतील. योजनेच्या तेराव्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते अनिवार्य केलेले असल्याने IPPB मार्फत 1 ते 12 फेब्रुवारी, 2023 या कालावधीत राज्यात मोहिम राबविण्यात येत आहे. IPPB मार्फत आयोजित या मोहिमेमध्ये राज्यातील सर्व प्रलंबित लाभार्थींनी त्यांचे बँक खाते उघडावे, असे आवाहन राज्याचे कृषी संचालक विकास पाटील यांनी केले आहे.
ही आधार सीडिंग पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपात्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. IPPB मध्ये बँक खाते सुरु करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थींना इतरत्र जाण्याची गरज पडणार नाही. असे अधीक्षक डाकघर, जळगाव डाक विभाग बी. व्ही. चव्हाण यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.