‘प्रमाण लेखनविषयक नियमांचा प्रचार व प्रसार व्हायला हवा’- श्री.समाधान पाटील

‘प्रमाण लेखनविषयक नियमांचा प्रचार व प्रसार व्हायला हवा’- श्री.समाधान पाटील

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त’ सिल्वासा येथील श्री.समाधान पाटील यांचे ‘मराठी प्रमाण लेखनाचे नियम व त्यांचे महत्व’ या विषयावरील ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, उपप्राचार्य श्री.बी.एस.हळपे, मार्गदर्शक श्री.समाधान पाटील, सौ.एम.टी.शिंदे आदि मान्यवर ऑनलाईन उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना श्री.एस.बी. पाटील म्हणाले की, भाषा ही प्रवाही असून त्यात कालानुरूप अनेक भाषांमधील शब्द येऊन मिसळतात यामुळे भाषेला नवे रुप प्राप्त होते. असे असले तरी प्रमाणलेखन नियमांचा अवलंब करून लेखनपद्धती सुधारायला हवी.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्यांचा परिचय श्री.एन.बी.शिरसाठ यांनी करून दिला.
यावेळी ‘मराठी प्रमाण लेखनाचे नियम व त्यांचे महत्व’ या विषयावर मार्गदर्शन करतांना श्री.समाधान पाटील म्हणाले की, ‘प्रमाणभाषा व बोली या वेगळ्या असून त्यांना स्वतंत्रपणे व्याकरण व्यवस्था असते. शासनाने नेमून दिलेल्या प्रमाणलेखन नियमांचा प्रचार व प्रसार करायला हवा तरच लेखनप्रक्रियेत सुधारणा होईल. देवनागरी ही शास्त्रीय लिपी असून प्रमाण लेखनासाठी वर्णमाला ज्ञात हवी.संधी व जोडाक्षर विषयक नियम माहिती असायला हवे तरच प्रमाणलेखन करता येईल’.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना उपप्राचार्य श्री.बी.एस.हळपे म्हणाले की, प्रमाणलेखन ही लेखनातील महत्वपूर्ण प्रक्रिया असून लेखननियम विद्यार्थ्यांपर्यत पोचविण्याचे कार्य केल्यास लेखनातील चुका सुधारता येतील. म्हणून शासनाने ठरविलेल्या प्रमाणलेखन विषयक नियमांची माहिती सर्व घटकांपर्यंत पोचविणे ही काळाची गरज आहे’.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.एम.एल. भुसारे यांनी केले तर आभार श्री.जी.बी.बडगुजर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.एन.बी.पाटील व सौ.पी.आर.दाभाडे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यापीठ परिक्षेत्रातील मराठी विषयाचे प्राध्यापक, बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी ऑनलाईन उपस्थित होते.