राज्यातील असे आहेत लॉकडाऊनचे नवीन निर्बंध

असे आहे लॉकडाऊनचे नवीन निर्बंध

राज्य सरकारने महाराष्ट्रात १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाउन लागू केला आहे. यामध्ये संचारबंदीसोबतच इतरही अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्या निर्बंधांमध्ये आता अजून वाढ करण्यात आली असून लॉकडाउनच्या निर्बंधांमध्ये बदल करण्यात आले आहेत. विशेषत: सकाळी ७ ते ११ या कालावधीमध्येच किराणा, भाजीपाला, फळे अशा सेवा उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २० एप्रिल रोजी संध्याकाळी ८ वाजेपासून हे नियम लागू केले जाणार आहेत.

काय आहेत नवे निर्बंध?
राज्य सरकारने नव्या निर्बंधांबाबत आदेश काढून त्यामध्ये खालील बाबींचा समावेश केला आहे.

१. सर्व किराणा दुकाने, भाज्यांची दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, सर्व प्रकरची अन्नपदार्थांची दुकाने, मांस-मच्छी-मटण विक्रेते, शेती उत्पादनांशी संबंधित दुकाने, प्राण्यांचे अन्नपदार्थ विकणारी दुकाने, पावसाळी साहित्य (छत्री, रेनकोट, ताडपत्री इ.) विकणारी दुकाने यांना सकाळी ७ ते ११ या वेळेतच परवानगी देण्यात आली आहे

२. दरम्यान, वरील सर्व दुकानांमधून होम डिलीव्हरी मात्र सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये स्थानिक प्रशासनाला परिस्थितीनुरूप बदल करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत*
*३. स्थानिक आपत्ती निवारण व्यवस्थापनाला कोणत्याही सेवेचा किंवा सुविधेचा समावेश अत्यावश्यक सेवा किंवा सुविधेमध्ये करायचा असल्यास त्यासाठी राज्य आपत्ती निवारण व्यवस्थापनाची परवानगी घेणं बंधनकारक असेल
४. वर उल्लेख केलेल्या नव्या बदलांशिवाय इतर सर्व निर्बंध हे १३ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आलेल्या निर्बंधांनुसारच असतील
दरम्यान, सोमवारी संध्याकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यातील करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक झाली होती. या बैठकीमध्ये राज्यातील किराणाची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. किराणा खरेदीचं कारण सांगून नागरिक अकारण बाहेर फिरताना आढळत असून त्यामुळे करोनाचा धोका देखील वाढत असल्याचं निरीक्षण या बैठकीमध्ये नोंदवण्यात आलं होतं. त्यानंतर आता किराणासोबतच फळे, भाजीपाला, अन्नपदार्थ विक्री, शेती उत्पादने अशा सेवांबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, राज्य सरकारने केलेल्या या बदलांनंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून यावर टीका करण्यात आली आहे. “सरकारचा नियोजनशून्य कारभार सुरू आहे. ४ तासांचे निर्बंध घातल्यामुळे आता फक्त त्या ४ तासांमध्येच गर्दी वाढू नये यासाठी नियोजन करणे आवश्यक झाले आहे.