महिलांमध्ये ठाणे वि. उस्मानाबाद तर पुरुषांमध्ये मुंबई उपनगर वि. पुणे यांच्यात अंतिम लढत

_महिलांमध्ये ठाणे वि. उस्मानाबाद तर पुरुषांमध्ये मुंबई उपनगर वि. पुणे यांच्यात अंतिम लढत….!!!!!_

जळगाव : महाराष्ट्र क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र शासन,महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आणि महाराष्ट्र खो -खो असोसिएशन यांच्या सहकार्याने जळगांव येथे महाराष्ट्र ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सुरू आहे. या खो-खो स्पर्धेत महिला गटाचा अंतिम सामना ठाणे विरुद्ध उस्मानाबाद तर पुरुष गटाचा सामना मुंबई उपनगर विरुद्ध पुणे यांच्यात होईल.

जळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे सुरु असलेल्या खो-खो स्पर्धेत उपांत्य फेरीत महिलांमध्ये ठाण्याने कोल्हापूरचा 11-9 असा 7 मिनिटे 20 सेकंद राखून 2 गुणांनी धुवा उडवला. ठाणेच्या रेश्मा राठोड (2.20, 1.00 मि. संरक्षण व 1 गुण ), अश्विनी मोरे (2.10, 1.20 मि. संरक्षण व 1 गुण ), शीतल भोर (1.20 मि. संरक्षण व 3 गुण ), गीतांजली नरसाळे (1.50 मि. व 2.30 मि. संरक्षण ) यांनी विजयात मोलाची कामगिरी केली. कोल्हापूरच्या पूर्वा सुतार (1.30 मि. संरक्षण व 3 गुण ), स्वाती पाटील (1.10, 1.10 मि. संरक्षण ) यांनी जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला.

दुसऱ्या उपांत्य सामन्यात उस्मानाबादने नाशिकवर 10-9 असा 1 गुण व 5.30 मिनिटे राखून दणदणीत विजय मिळवला. उस्मानाबादच्या अश्विनी शिंदे (4.00, 2.40 मि. संरक्षण व 2 गुण ), संपदा मोरे (2.30, 2.00 मि. संरक्षण व 1 गुण ), प्रणाली काळे (1.40, 1.10 मि. संरक्षण व 1 गुण ), प्राची नटनुरे (4 गुण ) यांनी बहारदार खेळ केला. नाशिकच्या ज्योती मेदे (1.20, 1.20 मि. संरक्षण), निशा वैजल (1.40, 1.30 मि. संरक्षण व 3 गुण ) यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.

पुरुष गटात उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात उपनगरने ठाण्याचा 17-16 असा एक गुण 0.40 सेंकद राखून विजय मिळवला. उपनगरतर्फे हर्षद हातणकर (2.20 मिनिटे संरक्षण व 1 गुण), निहार दुबळे (4 गुण ), अनिकेत चेंदवणेकर (1.50 मि. संरक्षण व 2 गुण ) असा खेळ केला. तर ठाणे संघाकडून आकाश तोगरे (1.30, 1.10 मिनिटे संरक्षण ), गजानन शेंगाळे (1.00 मि. संरक्षण व 3 गुण ) असा खेळ केला.

दुसऱ्या उपांत्य सामन्यात पुणे संघाने कोल्हापूरचा 1 गुण आणि 3 मिनिटे 30 सेकंद राखून विजय मिळवला. पुणेकडून प्रतिक वायकर (1.30, 2.00 मि. संरक्षण व 2 गुण), आदित्य गणपूले (1.50, 1.20 मि. संरक्षण व 1 गुण ) तर कोल्हापूर कडून अविनाश देसाई (1.20 मि. संरक्षण व 3 गुण ), आदर्श मोहिते (1.40 मि. संरक्षण व 2 गुण ) यांनी चांगला खेळ केला.
——————-
रत्नागिरीने कोल्हापूरला झुंजवले

जादा डावापर्यंत रंगलेल्या महिलांच्या उपउपांत्य फेरीतील सामन्यात कोल्हापूरला रत्नागिरीने चांगलेच झुंजवले. मध्यंतराला रत्नागिरीकडे एक गुणांची आघाडी होती. कोल्हापूरने दुसऱ्या आक्रमणात 8 गुण मिळवत आव्हान कायम ठेवले. रत्नागिरीने 7 गुण मिळवल्याने सामना बरोबरीत झाला. जादा डावात कोल्हापूरने 6 गुण मिळवले. मात्र रत्नागिरीला 4 गुण मिळवता आले. कोल्हापूरने हा सामना 2 गुणांनी जिंकला. रत्नागिरीतर्फे अपेक्षा सुतार (2.50, 4.00, 1.40 मि. संरक्षण व 7 गुण ), पायल पवार (2.20, 1.10, 2.30 मि. संरक्षण व 2 गुण ), माधवी बोरसुतकर (1.20, 1.30, 1.50 मि. संरक्षण), दिव्या पाल्ये (5 गुण ) असा खेळ केला. कोल्हापूरतर्फे स्वाती पाटील (2.20, 1.30, 1.30 मि. संरक्षण ), सौदर्य सुतार (1.40 मि. संरक्षण व 8 गुण ), श्रेया पाटील (1.50, 1.20, 1.30 मि. नाबाद ) यांनी चांगला खेळ केला.
—————-
जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षीत,क्रीडा अधिकारी तथा एकलव्य पुरस्कारप्राप्त माजी राष्ट्रीय खेळाडू गुरुदत्त चव्हाण,महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सहसचिव जयांशु पोळ,जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव राहुल पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल पाटील,दिलीप चौधरी,दत्तात्रय महाजन,अनिल माकडे,सुशांत जाधव,प्रेमचंद चौधरी व इतर आजी-माजी खेळाडू मेहनत घेत आहेत.