कजगाव येथील शेतकरी गट दूध संकलन व शीतकरण केंद्राचे उद्घाटन
तालुक्यातील सार्वे पिंप्री येथील शेतकरी बांधवांनी गट स्थापन करून या गटा अंतर्गत कजगाव येथे भूमिपुत्र शेतकरी गट व मंगलमूर्ती ग्रुप यांच्या संयुक्तपणे दूध संकलन व शीतकरण केंद्र उभारले असून या केंद्राचे उद्घाटन चाळीसगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय परवडत नसून त्यात सातत्याने घाटा होत असल्याचे सांगत या उदासीनतेतून अनेक शेतकरी आत्महत्या करत असल्याच्या वार्ता नियमित पहावयास मिळतात. मात्र या नकारात्मक विचाराला छेद देत शेती सोबतच शेतीपूरक व्यवसाय चालू करून त्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्याची संकल्पना भूमिपुत्र शेतकरी गटातील बांधवांच्या मनात आली. याच संकल्पनेतून सार्वे पिंप्री येथील भूमिपुत्र शेतकरी गट व मंगलमूर्ती ग्रुप यांनी संयुक्तपणे कजगाव येथे दूध संकलन केंद्र उभारले असून या माध्यमातून परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना व लहानग्या डेरी व्यावसायिकांना स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध झाल्याने त्याचा लाभ मिळणार आहे.
भूमिपुत्र शेतकरी गटामार्फत सुरू करण्यात आलेला व्यवसाय हा कौतुकास्पद असून इतर शेतकरी बांधवांनी यातून प्रेरणा घेऊन शेतीपूरक व्यवसायाकडे वळण्याचे आवाहन उद्घाटन आ. मंगेश चव्हाण, कृषी उपसंचालक जळगाव ए व्ही भोकरे यांनी केले आहे. यासोबतच या भूमिपुत्रांना शुभेच्छा देण्यासाठी माजी जि प सदस्य रावसाहेब पाटील, सुमित किशोरआप्पा पाटील, ए व्ही जाधव कृषी अधिकारी नगरदेवळा पाचोरा, व्ही एस पाटील कृषी पर्यवेक्षक, एस ए कचवे कृषी सहाय्यक पिंपरी बु, किरण मांडवडे यांच्यासह मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.