निपाणे घटनेतील आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी पाचोऱ्यात आंबेडकरी जनतेचे तीव्र आंदोलन
पाचोरा(वार्ताहर) दि,२४
पाचोरा तालुक्यातील निपाणे येथे एका दलित समाजाच्या वृद्ध महिलेचा अंत्यसंस्कार गावातील सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये करण्यास जातीयवादी मानसीकतेतून मज्जाव केल्याची घटना दि. १२ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती. ही घटना अतिशय निंदनीय असुन या प्रकरणात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील यांचे सह ११ संशयितांच्या विरोधात पाचोरा पोलिसात अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल होऊन देखील अद्याप पोलिसांनी आरोपींना अटक न केल्याच्या निषेधार्थ पाचोरा तालुक्यातील सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.तसेच आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास शनिवारी यापेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.आंदोलनात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात आले. यावेळी आरोपीला तात्काळ अटक झालीच पाहिजे,जातीयवादी मनोवृत्तीचा निषेध असो यासह महापुरुषांच्या जयजयकाराच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.यावेळी बोलतांना ऍड रोहित ब्राह्मणे यांनी घटनेची कायदेशीर बाजू उपास्थितांना समजावून सांगत गरज पडल्यास सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई लढली जाईल असा विश्वास उपस्थितांना दिला. प्रस्थापित राजकीय पक्षांनी आंबेडकरी जनतेला गृहीत धरू नये असे सांगत घटनेचे तपास अधिकारी तथा पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी भरत काकडे यांनी आंदोलनकर्त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न देखील करू नये असे त्यांनी बजावले.
यावेळी आकाश नन्नवरे, किशोर डोंगरे यांनी मनोगत व्यक्त करत आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा पोलिसांना इशारा दिला.आंदोलनकर्त्यांनी पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना निवेदन दिले.त्यांनी आपल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहचवण्याचे उपस्थितांना आश्वासन दिले.यावेळी पाचोरा शहरातील नागसेन नगर ,जनता वसाहत, मिलिंद नगर, आंबेडकर नगर गाडगेबाबा नगर, भिम नगर यासह आदी भागातील तरुणांसह विविध आंबेडकरी समाज संघटनांचे पदाधिकारी व राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.