आ. गुलाबराव पाटील यांना वाढता पाठींबा
धरणगावच्या पाठोपाठ जळगाव तालुक्यातील पदाधिकार्यांचे राजीनामासत्र
जळगाव, दि.१७ ( प्रतिनिधी ) – राज्याचे माजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार गुलाबराव पाटील यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील पदाधिकार्यांचे राजीनामा सत्र सुरू झाले असून त्यांना वाढता पाठींबा मिळू लागला आहे. काल धरणगावातील प्रमुख पदाधिकार्यांनी शिवसेनेचा राजीनामा देऊन शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज जळगाव तालुक्यातील पदाधिकार्यांनीही हाच कित्ता गिरवत गुलाबभाऊंच्या पाठीशी राहण्याचा खंबीर निर्धार केला आहे. तालुक्यातील ६० पेक्षा जास्त पदाधिकार्यांनी आपापल्या पदांचे राजीनामे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांना सुपुर्द करून शिंदे गटात सहभागी होण्याचे जाहीर केले आहे. यात जिल्हा परिषद गट स्तरीय, पंचायत समिती गण स्तरीय तसेच विविध लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. यामुळे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आमदार गुलाबराव पाटील यांच्या सोबत बहुतांश पदाधिकारी असल्याचेही स्पष्ट झाले आहे.*
राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांचे पडसाद आता जिल्ह्यात व तालुक्यात देखील उमटू लागले आहेत. शिवसेनेविरोधात उठाव करत, ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठींबा दिल्यानंतर आता शिंदे गटात सहभागी झालेल्या आमदारांच्या समर्थनार्थ सेनेचे पदाधिकारी उतरत आहे. जळगाव ग्रामीणमधील धरणगाव तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकार्यानंतर आता जळगाव तालुक्यातील शिवसेनेच्या ६० हून अधिक पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी शिवसेना पदाधिकारी पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्याकडे देत, माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना आपला पाठींबा दिला आहे. यामध्ये उपजिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, उपजिल्हा संघटक नरेंद्र सोनवणे, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण यांच्यासह जि.प.चे माजी सदस्य पवन सोनवणे यांचाही समावेश आहे. जळगाव ग्रामीणमधील प्रमुख गावांच्या सरपंच, उपसरपंचांनी देखील गुलाबराव पाटील यांना समर्थन दिले आहे.
आज शहरातील अजिंठा विश्रामगृहात विष्णू भंगाळे यांच्याकडे या पदाधिकार्यांनी आपापले राजीनामा सुपुर्द केले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळणार असल्याने आमदार गुलाबरावजी पाटील यांनी त्यांची साथ घेतली आहे. तर आम्ही गुलाबभाऊंचे कट्टर समर्थक असून त्यांच्या पाठोपाठ आम्ही देखील शिंदे गटात प्रवेश करत असल्याची भावना याप्रसंगी पदाधिकार्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी जय भवानी, जय शिवाजी; एकनाथ शिंदे साहेबांचे विजय असो, गुलाबभाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है आदी घोषणांनी परिसर दणाणून निघाला.
दरम्यान, धरणगाव तालुक्याच्या पाठोपाठ जळगाव तालुक्यातील प्रमुख पदाधिकार्यांनी आपापल्या पदांचे राजीनामे देत आमदार गुलाबराव पाटील आणि पर्यायाने शिंदे गटाला पाठींबा दर्शविला आहे. तर, तालुका कार्यकारणीतील जवळ-जवळ सर्वच पदाधिकार्यांनी आपल्या पदाचे राजीनामे सोपविले असल्याने, जळगाव तालुक्यातील शिवसेनेला मोठे भगदाड पडल्याचे बोलले जात आहे. तालुक्यातील अनेक गावांच्या सरपंचांनी देखील यावेळी माजी मंत्री गुलाबराव पाटील यांना समर्थन दिले आहे. यामध्ये उपजिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, जिल्हा उपसंघटक नरेंद्र सोनवणे, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, जि.प.चे. माजी सदस्य पवन सोनवणे, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.कमलाकर पाटील, जनार्दन कोळी-पाटील, तालुका उपप्रमुख धोंडू जगताप, रमेश पाटील, रवी कापडणे, पी.के.पाटील, सुनील बडगुजर, अर्जुन पाटील, संदीप सुरळकर, तरसोदचे पंकज पाटील, सुनील मराठे, अनिल कोळी, हितेश आगीवाल, विजय आमले, संदीप सोनवणे, विजय सपकाळे, गजानन जगदाडे, नितीन ठामरे, सतीश चौधरी, महेंद्र पाटील यांच्यासह अनेक पदाधिकार्यांचा यामध्ये समावेश आहे.