पाचोरा तालुक्यातील १३ गावात घरपोच जातीचे दाखले वाटप
–
पं. स. सभापती वसंत गायकवाड यांनी केले भिल्ल वस्तीत घरपोच जातीचे दाखले वाटप
पाचोरा- तालुक्यातील भिल्ल समाजाच्या गोर – गरिब नागरिकांना शासकीय योजनांसाठी अत्यावश्यक असणारे जातीच्या दाखल्याची अडचणी भेडसावत असतांनाच शासनाच्या विविध योजनांपासुन अनेकांना वंचित राहावे लागत होते. याबाबत अनेकांनी पाचोरा पंचायत समितीचे सभापती वसंत गायकवाड यांचे कडे जातीचे दाखले मिळावे याकरिता व्यथा मांडली होती. याविषयी वसंत गायकवाड यांनी पाचोरा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांचेकडे भिल्ल समाजातील गरजुंना जातीचे दाखले मिळणेसाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करुन १३ गावातील ११७ लाभार्थ्यांना भिल्ल वस्तीवर घरपोच जातीचे दाखले वाटप केले आहे.
नगरदेवळा – बाळद जिल्हा परिषद गटातील भोरटेक खु” – २४, पिंप्री बु” प्र. पा. – १७, टाकळी बु” – ५, निपाणे – ५, चुंचाळे – १२, संगमेश्वर – ५, बाळद बु” – १७, दिघी – ४, सार्वे बु” प्र. भ. – १०, बदरखे – १५, आखतवाडे – १, घुसर्डी – १, अंतुर्ली खु” प्र. पा. १ अशा १३ गावातील एकुण ११७ भिल्ल, आदिवासी समाजाच्या गोर – गरिब नागरिकांना पंचायत समितीचे सभापती वसंत गायकवाड यांचे हस्ते घरपोच वाटप करण्यात आले. यावेळी एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष देविदास बहिरम, किशोर पाटील उपस्थित होते. याप्रसंगी भिल्ल समाजाच्या नागरिकांनी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील व पंचायत समिती सभापती वसंत गायकवाड यांचे आभार मानले.