खुर्ची खालची गोम डॉ.भाऊसाहेब मिस्तरी लेखक

खुर्ची खालची गोम

● डॉ.भाऊसाहेब मिस्तरी

” डॉक्टर माझ्याकडे पैसे नाहीत. मला पट्टी करून द्या हाताला काल दगड लागला मी पडलो होतो.”
एक हमाल माझ्याकडे दारू पिऊन आला आणि मला म्हणत होता. मी त्याला बस म्हटलं, पट्टी करता करता मी त्याला म्हटलं, ” दारू कशाला पितो तू ?”
” डॉक्टर चांगली एक वर्ष दारू सोडली होती पण बायकोच्या टेन्शनमध्ये पुन्हा पिऊ लागलो आता नाही पिणार ! ” तोवर पट्टी झाली होती. तो निघून गेला. ‘माझ्याकडे पैसे नाहीत ‘ तो पट्टी करून घेण्याआधी म्हणाला हे मला आवडलं होतं. बरेच लोकं काम झाल्यावर मग म्हणतात, ‘पैसे नाहीत मी नंतर आणून देईल. ‘ हे ऐकल्यावर थोडं मनाला खराब वाटतं पण आपण काही बोलू शकत नाही कारण आपल्या पेशंटला वाईट वाटू नये असं वाटतं. तो त्याच्या जवळ पैसे येतील तेव्हा पैसे आणून देईन या श्रद्धेवर त्याला आपण असंच सोडून देणे हेच त्यावेळेस योग्य असते.

कधीकधी रात्री-बेरात्री फोन वाजतो. आपण दवाखान्यात येतो. पेशंटला तपासून गोळ्या-औषधे देतो. तो जाता वेळी विचारतो,
” डॉक्टर तुमचे पैसे किती झालेत ? ” आपण पैसे सांगितले की तो म्हणतो,
” डॉक्टर पैसे घरी राहीलेत उद्या आणून देतो.” तेव्हा ही आपल्याला आपल्या मनावर खूप ताबा ठेवून शांत राहावं लागतं. हे आता माझ्या अंगवळणी पडून गेलं आहे. त्याला आपण फक्त म्हणावं,
” पैसे आले का ? आणून द्या बरं. ”
” हो हो ..”
म्हणत पेशंट आपल्या पासून जातो. तो पेशंट उद्या पैसे घेऊन येईल याचा विचार करावा लागत नसतो. जो पैसा आला तो आपला जो गेला तो त्यांचा म्हणून सोडून द्यावं लागतं.खेड्यात असं असतं.तुम्हांला नाही पटणार म्हणा.त्याला खेड्यातला अनुभव आहे त्याला सांगावं लागणार नाही. पुन्हा बेरात्री आपण घरी जाऊन घराला बाहेरून कुलूप लावून गेलो असतो. ते उघडून घरात जावं. माझ्यामुळे तुझी झोपमोड होऊ नये म्हणून मी ममताला सांगून ठेवलं आहे. ‘ मी रात्री पेशंट बघायला गेलो तर बाहेरून घराला कुलूप लावून जाईल. तू नको तुझी झोप रोज मोडत जाऊ.’ रात्रीतून मी किती वेळा पेशंट बघायला गेलो हे त्यांच्या गावी नसते. रात्री घरी येताच लगेच झोप लागत नाही. मग एखादी कथा,कादंबरी वाचण्यासाठी हातात घ्यावी. ममताला जाग आली की ती मला म्हणते,
” अजून झोपले नाहीत का ? ”
” हो झोपतो !” म्हणून मी अंग टाकतो पण लगेच झोप येत नाही. एखादी नवी गोष्ट, कल्पना सुचली की ती झोपू देत नाही. मग तिला जन्म द्यावा. कधी कधी तिला आपल्या मनाच्या गर्भात पडू देतो , वाढू देतो. मग निवांत झोपतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी दवाखान्यात वेळेवर जावं. न कळत कधी कधी दुपारी खुर्चीवर क्षणभर डोळे लागतात. तितक्यात पेशंट येऊन उभं राहतं आणि म्हणतं,
” तुमच्या सारखं सुखी कोणी नाही. निवांत झोप लागली बघा डॉक्टर तुम्हांला !”
त्यावर आपण काय बोलावं ?
“रात्री पेशंट होतं.” इतकं बोलून, तुम्हांला काय झालं विचारून पेशंट बघावं.
आता पैशावरची वासना उडत चालली आहे. जगण्यापुरता पैसा यावा आणि आपल्या हातून रूग्णसेवा, साहित्यसेवा होत रहावी हीच काय देवाकडून मी मागणे मागतो. माझ्यासह माझ्या बरोबर राहणारा सर्व वर्ग सुखी होऊ दे हीच मागणी मी देवाला करतो.

‘जावे त्याच्या वंशा मग कळे ‘ हे मात्र खरं आहे. डॉक्टर आणि डॉक्टरची खुर्ची लोकांना खूप सुखाची वाटते पण त्या ‘खुर्ची खालची गोम ‘ त्या खुर्चीवर बसल्यावर समजते हे मात्र खरं.

● डॉ.भाऊसाहेब मिस्तरी
मो.9960294001