महाराष्ट्रात घटस्फोटांचे वाढते प्रमाण : नात्यांच्या तुटकाव्यावर एक चिंतन – सौ शितल महाजन
पाचोरा नुकतीच एक धक्कादायक बातमी वाचनास मिळाली देशभरातील सर्व घटस्फोटांपैकी तब्बल 18.7 टक्के घटस्फोट केवळ महाराष्ट्रात होत आहेत. हे प्रमाण सर्व राज्यांमध्ये सर्वाधिक असून एक गंभीर सामाजिक चिंता व्यक्त करणारे होतेच त्यासोबत चिंतन करणारे होते कारण भारतीय समाजव्यवस्थेत विवाह ही एक केवळ सामाजिक रचना नव्हे, तर ती एक भावनिक, सांस्कृतिक आणि नैतिक बांधिलकी मानली जाते. विवाहसंस्था ही आपल्या जीवनातील स्थैर्याचा केंद्रबिंदू मानली गेली आहे. मात्र, बदलत्या जीवनशैलीत, आधुनिकतेच्या नावाखाली झपाट्याने बदलणाऱ्या मूल्यव्यवस्थेमुळे आणि भावनिक गुंतवणुकीच्या कमतरतेमुळे ही संस्था आज मोठ्या संकटात आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे ‘कम्प्युटर्स इन ह्यूमन बिहेवियर’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेला एक संशोधनात्मक अहवाल, ज्यामध्ये भारतात घटस्फोटांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढल्याचे स्पष्ट केले आहे. या अहवालातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे देशभरातील सर्व घटस्फोटांपैकी तब्बल 18.7 टक्के घटस्फोट केवळ महाराष्ट्रात होत आहेत. हे प्रमाण सर्व राज्यांमध्ये सर्वाधिक असून एक गंभीर सामाजिक चिंता व्यक्त करणारे आहे. गेल्या तीन वर्षांत देशभरात घटस्फोटांच्या संख्येत तिप्पट वाढ झाल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे. महाराष्ट्रासोबतच कर्नाटकमध्ये 11.7 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 8.2 टक्के, दिल्लीमध्ये 7.7 टक्के, तमिळनाडूमध्ये 7.1 टक्के, तेलंगणामध्ये 6.7 टक्के, केरळमध्ये 6.3 टक्के तर राजस्थानमध्ये 2.5 टक्के घटस्फोटांची प्रकरणं नोंदवली जात आहेत. हे आकडे दर्शवतात की वैवाहिक जीवनात स्थैर्य टिकवण्याचे आव्हान सर्वत्र वाढले आहे.विशेष लक्षवेधी बाब म्हणजे घटस्फोट घेणाऱ्या दाम्पत्यांमध्ये 25 ते 34 वयोगटातील लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ही वयोमर्यादा अशी आहे की जिथे आयुष्याच्या अनेक जबाबदाऱ्या एकत्रितपणे येतात — करिअर, आर्थिक नियोजन, कौटुंबिक अपेक्षा, पालकत्व, सामाजिक जबाबदाऱ्या यांमध्ये तोल सांभाळणं खूप कठीण होतं. यामुळे अनेकदा वैवाहिक नात्यांमध्ये तणाव वाढतो आणि शेवटी तो तुटण्याच्या टप्प्यावरपोहोचतो. या संशोधनातून समोर आलेली एक गंभीर बाब म्हणजे सोशल मीडियाचा विवाह नात्यांवरील वाढता दुष्परिणाम. डिजिटल युगात सोशल मीडियावरील ओढ अधिक झाल्याने प्रत्यक्ष संवाद मागे पडला आहे. अनेकदा सोशल मीडियावरील आभासी आकर्षणं, अनोळखी लोकांशी वाढलेली मैत्री, किंवा जोडीदाराच्या पोस्टवरील प्रतिक्रिया या गोष्टी नात्यांमध्ये संशयाची बीजे पेरतात. यामुळे भावनिक अंतर वाढते आणि नात्यांची वीण सैलावते. काही वेळा सोशल मीडियावर आलेल्या गुप्त मैत्री, चुकीच्या संवादांची माहिती मिळाल्यानंतर नात्यांमध्ये विश्वास हरवतो, जे घटस्फोटाच्या मुख्य कारणांपैकी एक ठरत आहे.याशिवाय आधुनिक जीवनशैलीमुळे आलेली धावपळ, जोडीदाराला न मिळणारा वेळ, करिअरमुळे निर्माण होणारा ताण, सतत वाढणारी महागाई आणि कर्जबाजारीपणा या सर्व कारणांनी वैवाहिक जीवनावर मोठा ताण येत आहे. आजच्या युगात दोघेही नोकरी करत असल्यामुळे त्यांच्या जीवनात वेळेची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवते. नात्यांमध्ये भावनिक सहवासासाठी आणि संवादासाठी आवश्यक असलेला वेळ उपलब्ध नसल्यानं, बऱ्याचदा गैरसमज आणि अंतर वाढू लागते अनेक दाम्पत्यांमध्ये नात्यांबाबत असलेल्या अपेक्षा, जबाबदाऱ्यांविषयी दृष्टिकोन यामध्ये फरक असतो. स्त्री-पुरुष समानतेच्या जागृतीनंतर अनेक स्त्रिया स्वाभिमानाने, आत्मनिर्भरतेने निर्णय घेऊ लागल्या आहेत. काहीवेळा हे स्वातंत्र्य नवऱ्यांना पचत नाही आणि तिथेच संघर्ष सुरू होतो. संयुक्त कुटुंबातील हस्तक्षेप, सासरच्यांचा वर्चस्ववादी हस्तक्षेप, यांसारख्या सामाजिक गोष्टी देखील नात्यांमध्ये वितुष्ट निर्माण करतात.मानसिक आरोग्य हा घटस्फोटाच्या वाढीमागील आणखी एक गंभीर घटक ठरतो आहे. वैवाहिक जीवनात ताण-तणाव, नैराश्य, असमाधान यावर वेळेवर उपाय न केल्यास, ते नात्याच्या आरोग्यावर परिणाम करते. दुर्दैवाने आपल्या समाजात मानसिक आरोग्याविषयी अजूनही आवश्यक ती जागरूकता नाही. संवादाऐवजी मौन, सहकार्याऐवजी तणाव आणि समजुतीऐवजी अहंकार – या प्रवृत्ती विवाहसंस्थेला खिळखिळं करत आहेत. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून समुपदेशनाची गरज अधोरेखित होते. विवाहपूर्व समुपदेशन, विवाहानंतर नियमित सल्ला, मानसिक आरोग्याविषयी जागरूकता, कुटुंबसंस्थेच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करणारे उपक्रम आणि भावनिक संवाद वाढवण्यावर भर देणे ही काळाची गरज आहे. शिक्षणपातळीवर ‘नातेसंबंध व्यवस्थापन’, ‘संवाद कौशल्ये’ यांसारखे अभ्यासक्रम राबवले पाहिजेत. पालकांनीही आपल्या मुलांमध्ये नात्यांविषयी समज, सहिष्णुता आणि समजूतदारपणा निर्माण करण्याचा प्रयत्न करायला हवा. आज समाज एका वळणावर उभा आहे. विवाहसंस्था टिकवण्यासाठी केवळ कायदेशीर नियम नव्हे, तर भावनिक समृद्धीची आवश्यकता आहे. नात्यांची वीण केवळ संस्कारांनी जपता येत नाही, तर त्यासाठी परस्पर संवाद, विश्वास, समर्पण आणि सहकार्यही तेवढंच महत्त्वाचं असतं. घटस्फोट हे केवळ दोन व्यक्तींचं वेगळं होणं नसतं, तर ते संपूर्ण सामाजिक साखळीवर परिणाम करतं. त्यामुळे याचा विचार व्यक्तिगत न राहता सामाजिक म्हणून केला पाहिजे.समाज म्हणून आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की घटस्फोटाची संख्यात्मक वाढ ही केवळ आकड्यांची गोष्ट नाही, ती आपल्या मूल्यव्यवस्थेतील बदलांचे प्रतिबिंब आहे. विवाहसंस्थेचे महत्व जपायचं असेल तर आपल्याला नात्यांमध्ये नवसंवादाची सुरुवात करावी लागेल. कारण नात्यांची वीण फक्त एका विधीने घट्ट होत नाही, ती रोजच्या सहवासाने, संवादाने, समजुतीने आणि प्रेमाने टिकते. हीच जाणीव नव्या पिढीला करून देणे, हे काळाचे खरे आव्हान आहे. ✨ ….✒️ लेखक -सौ शितल संदिप महाजन, (उप- शिक्षीका श्री गो.से. हायस्कूल पाचोरा) MO.7588645908