सातवड येथील संत्र्याच्या बागेत सख्खे भाऊ झाले पक्के वैरी, भावानेच काढला भावाचा काटा! आईने धरल्या मग पोलिस स्टेशनच्या वाटा?
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) फार वर्षांपूर्वी मराठी सिनेमात सख्खे भाऊ पक्के वैरी हा चित्रपट अत्यंत गाजला होता त्या नंतर तमाषा कलावंतांनी याच नावाने वगनाट्य सुरू करून महाराष्ट्रातील तमाम रसिकांची चांगलीच करमणूक केली होती. त्याचा प्रत्यक्ष अनुभव आता अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील सातवड या गावात आला आहे.या बाबदची घटना अशी की रविवार दिनांक ९ मार्च २०२५ रोजी डॉ अशोक रामराव पाठक (वय 39) राहणार सातवड तालुका पाथर्डी, हल्ली मुक्काम,साईवीरा बिल्डिंग,नवनाथ नगर तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर हा वरील दिवशी आपल्या मुळ गावी सातवड येथे आला होता.त्यावेळी अशोक पाठक यांचा सख्खा भाऊ सोमनाथ रामराव पाठक (वय 32)हा सतत दारू पिऊन त्याची आई सिंधुबाई रामराव पाठक यांना आणि त्याच्या स्वतःच्या मुलास जीवे मारून विहीरीत टाकण्याची धमकी देत होता.त्याच वेळी सख्खा भाउ अशोक हा दारूच्या नशेत असलेल्या मयत सोमनाथ यास समजावून सांगण्यासाठी गेला असता त्याने त्याची आई सिंधुबाई आणि स्वतःच्या मुलास जीवे मारण्यासाठी पुन्हा धमकी दिली.मुद्यावरची लढाई गुद्द्यावर आली. दोघांच्या झटापटीत संशयित आरोपी अशोक पाठक यांनी लाकडी दांडक्याने आपला सख्खा भाऊ सोमनाथ पाठक याला डोक्यावर,पाठीवर, छातीवर,पायांवर जोरदार मारहाण केली. त्यावेळी मयत सोमनाथ हा त्याच्या संत्र्याच्या बागेत पळाला त्याचवेळी संशयित आरोपी अशोक पाठक यांनी त्याचा पाठलाग करून शिव्या देणाऱ्या सोमनाथ पाठक यास पकडले आणि प्रथम त्याचे हात बांधून त्याला एका संत्र्याच्या झाडाला बांधून चांगलेच चोपले. ज्या वेळी मयताची हालचाल थांबली त्याच वेळी आरोपीने त्यांचे हात पाय सोडले. त्या नंतर आरोपी अशोक पाठक हा कोणाला काही माहिती न सांगता तेथुन निघुन गेला असल्याची माहिती त्याने पोलिसांना सांगितली. त्यानंतर मयताची आई सौ.सिंधुबाई रामराव पाठक रा.सातवड तालुका पाथर्डी या सोमवार दिनांक 10 मार्च 2025 रोजी भल्या पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास शेतातील मोटार चालू करण्यासाठी गेल्या असता त्यांना त्यांच्या शेतातील संत्र्याच्या बागेत आपला मुलगा सोमनाथ रामराव पाठक हा मयत अवस्थेत मिळून आला अशी खबर त्यांनी पाथर्डी पोलीसांना दिली.मग पाथर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 43/2025 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली.अकस्मात म्रुत्युच्या तपासात अज्ञात आरोपीने अज्ञात कारणास्तव मयत सोमनाथ रामराव पाठक (वय32) राहणार सातवड तालुका पाथर्डी याच्या शरीराच्या विविध भागावर मारहाण करून जीवे ठार मारले या आशयाचा पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 226/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक यांना या उघड खुनाच्या गुन्ह्याची प्राथमिक माहिती मिळताच त्यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना समांतर तपास करण्यासाठी आदेश दिले.त्या अनुषंगाने दिनेश आहेर यांनी तपास पथकात पोलिस सब इन्स्पेक्टर अनंत सालगुडे, पोलिस अंमलदार सुरेश माळी, ज्ञानेश्वर शिंदे, संदिप दरंदले, अरुण गांगुर्डे, विजय ठोंबरे, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ, मेघराज कोल्हे,फुरकान शेख, चंद्रकांत कुसळकर, प्रशांत राठोड यांचे पथक तयार करून गुन्ह्यातील आरोपीची माहिती व शोध घेण्यासाठी सुचना देउन मार्गदर्शन केले आणि तपास पथकास रवाना केले.दिनांक 11/3/2025 रोजी गुन्ह्याचा तपास करीत असताना तपास पथकास पाथर्डी पोलिस स्टेशनच्या हद्दीत तांत्रिक विश्लेषण व साक्षिदाराच्या चौकशीतील विसंगती वरून सदरचा गुन्हा हा मयताच्या सख्खा भाऊ अशोक पाठक यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले.मग तपास पथकाने निष्पन्न आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानें आपले नाव डॉ अशोक रामराव पाठक वय 39 राहणार सातवड, तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर, हल्ली मुक्काम साईवीरा बिल्डिंग नवनाथ नगर, तालुका राहता,जिल्हा अहिल्यानगर असे सांगितले आणि झालेल्या गुन्ह्याची पोलिसांना कबुली दिली आहे.सदर ताब्यातील संशयित आरोपीस गुन्ह्याच्या तपासाकामी पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब हे करीत आहेत.”कानून के हाथ, बहोत लंबे होते है, हे अहिल्यानगर जिल्हा पोलीसांनी दाखवून दिले आहे.घडलेल्या या घटनेवरुन “सख्खे भाऊ पक्के वैरी” झाल्याचे दिसून आले आहे.