श्रीक्षेत्र मढीच्या कानिफनाथ गडावर पेटवली महाराष्ट्रातील मानाची पहिली होळी 

श्रीक्षेत्र मढीच्या कानिफनाथ गडावर पेटवली महाराष्ट्रातील मानाची पहिली होळी

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) ‌‌ संपूर्ण महाराष्ट्रात भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थान गडावर महाराष्ट्रातील पहीली मानाची होळी अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते महाआरती करून पेटविण्यात आली. माघ महिन्यातील अमावस्या झाली की दुसऱ्या दिवशी ही मानाची होळी पेटवली जाते.याच दिवसाला “भट्टीचा सण” म्हणतात.या दिवशी मढी गावातील सर्व महीला भगिनी शेणाच्या पासून तयार केलेल्या गोवऱ्या वाजत गाजत गडावर घेऊन येतात. त्या एकत्र करून रचल्या जातात त्याची विश्वस्तांच्या हस्ते विधीवत पूजा केली जाते.मग या होळीला घरोघरी केलेल्या पुरणपोळीचा नैवद्य दाखवून ही होळी पेटवली जाते.याच होळीचे भस्म भाविक वर्षभर आपल्या कपाळावर लावण्यासाठी वापरतात. आमावस्या नंतर चौथ्या किंवा पाचव्या दिवशी नाथांच्या समाधिला तेल लावण्याची प्रथा आहे. या दिवशी कानिफनाथ महाराज गादीवर ध्यानस्थ बसतात अशी आख्यायिका आहे. तेल लागल्या नंतर शेतीची सर्व कामे बंद ठेवण्यात येतात.यावर्षी ४ मार्च या तारखेला तेल लावले जाणार आहे.या काळात भाविक केस कापणे, नविन वस्त्र परिधान करणे, अलंकार परिधान करणे, गोडधोड पदार्थ खाणे, समागम करणे, गादी वापरणे,काॅट वापरणे, तेलातून पदार्थ तळणे ,ही सर्व कामे वर्ज्य करून सर्व भाविक व्रतस्थ राहतात. कोणीही या नियमांचे उल्लंघन करीत नाहीत.जर एखाद्याने उल्लंघन केले तर कानिफनाथ महाराज त्यांना शिक्षा देतात हा अनेकांना अनुभव आहे.भट्टीच्या सणानंतर यात्रेचा काळ सुरू होतो.प्रथम कळस उतरवून स्वच्छ करून पुन्हा चढवला जातो.पौर्णीमेला जी होळी पेटवली जाते ती कैकाडी आणि गोपाळ समाजाची असते.१९ मार्चला रंगपंचमीच्या दिवशी नाथांनी समाधी घेतली म्हणून हा दिवस अतिशय पवित्र मानला जातो. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व जाती धर्माचे भाविक भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात.म्हणून या दिवशी यात्रा भरते तसेच याच दिवशी गाढवांचा बाजार ही भरवला जातो.दि.२५ मार्चला कावडीने पाणी आणण्यासाठी निशाण घेऊन भाविक पैठण कडे प्रस्थान करतात.या वर्षी दि.२५ ते२८ मार्च या काळात सर्व सामान्य भाविकांना मुक्तद्वार समाधी गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात येणार आहे.आणि २९ मार्च या दिवशी फाल्गुन अमावस्येला नाथ महाराज प्रकट झाले म्हणून या दिवशी फुलरबाग यात्रा भरते.नाथ महाराज रंगपंचमीच्या दिवशी समाधीस्त झाले तर अमावस्येच्या दिवशी प्रकट झाले म्हणून या दिवशी फुलरबाग यात्रा भरते.पैठणहुन कावड घेऊन येताना जवळून वाहणाऱ्या नदीकाठी आमराईत कावड टेकवून नदीमध्ये नाथांनी स्नान केले. ती पावन झाली म्हणून या नदिला पावनगंगा उर्फ पौनानदी असे नाव पडले.आमावस्येच्या दिवशी आमराईतील फुलरबाग यात्रेतील विसाव्या नंतर सायंकाळी चार वाजता कावडी निशाण घेऊन गडाकडे येत असताना त्यांची भेट घेण्यासाठी गडावरून वाजतगाजत निघालेला पंचधातूचा घोडा आणि गडाच्या विश्वस्ता सोबत निघालेल्या पालखीची लक्ष्मी मातेच्या मंदिराजवळ निशाणभेट होते. निशाणाच्या भेटीच्या मानाच्या पाच गावांतील कावडींना हा मान दिला जातो. त्यामध्ये (मढी, पैठण, सावरगाव,मीरी,) आणि (कासार पिंपळगाव,सुसरे, साकेगाव,हात्राळ,माळी बाभुळगाव, निवडुंगे यांची मिळून एक) अशा पाच मानाच्या समजल्या जाणाऱ्या कावडींना विशेष महत्त्वाचा मान आहे. निशान भेटीचा हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात. यावेळी निशान भेटीवरून वाद होऊ नये म्हणून पाथर्डी पोलिस स्टेशन कडून चोख बंदोबस्त ठेवला जातो. यात्रा काळात गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी एक महिनाभर पोलिसांची छावणी दत्त मंदिरासमोर उभारण्यात येते.दि.३० मार्च रोजी पाडव्याच्या दिवशी भल्या पहाटे महाअभिषेक,होमहवन,नगारा वाजवून पुजा आरती केली जाते. गडावरील होळी पेटवण्यासाठी भाजपाचे नेते तुषार भोसले,सरपंच संजय मरकड, बबनतात्याउर्फ राधाकिसन मरकड, डॉ विलास मढीकर, देविदास मरकड, भाऊसाहेब मरकड, व्यवस्थापक संजय मोहन मरकड, कार्यकारी अधिकारी अशोक पवार साहेब हे आवर्जून उपस्थित होते. रविंद्र आरोळे, हे विश्वस्त प्रक्रुतीच्या कारणास्तव भेट देऊन गेले होते.यात्रा काळात मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना यात्रेत दुकानं लावण्यासाठी बंदी घालण्यात आलेल्या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात वादाची ठिणगी पडली आहे. या होळीच्या अग्नीत ही वादाची ठिणगी भस्मसात होते की पुन्हा धुमसते या कडे सर्व महाराष्ट्रातील अठरापगड जातीच्या लोकांचे लक्ष लागले आहे.यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन मोठ्या तैनातीत सज्ज झाले आहे.या होळी पेटवन्याच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.