हिरक महोत्सवी पुरुष-महिला खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र सज्ज
पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा शेवगावला
मुंबई, ता. 20 : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने ६० वी (हिरक महोत्सवी) पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा १३ ते १६ मार्च २०२५ या कालावधीत शेवगाव (जि. अहिल्यानगर) येथे रंगणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा राज्य खो-खो असोसिएशनचे सचिव प्रा. डॉ. चंद्रजित जाधव यांनी केली आहे.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतून ५७ व्या पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ निवडले जाणार आहेत. स्पर्धेचे आयोजन शेवगाव स्पोर्ट्स, बहुउद्देशीय फाऊंडेशन, सत्यभामा प्रतिष्ठान व अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यु आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने खंडोबा मैदान, शेवगाव येथे करण्यात आले आहे.
संघ नोंदणीसाठी १० मार्च अंतिम मुदत!
राज्यातील सर्व जिल्हा संघटनांनी आपल्या संघाच्या प्रवेशिका १० मार्चपर्यंत राज्य संघटनेकडे सादर करणे बंधनकारक आहे. तसेच सहभागी खेळाडूंनी १२ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत शेवगाव येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे. जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेतलेल्या खेळाडूंची नोंदणी झालेली असणे अनिवार्य असून, संबंधित जिल्हा संघटनेकडून त्यांची अधिकृत यादी राज्य संघटनेकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे. अन्यथा, अशा संघांना स्पर्धेत प्रवेश नाकारला जाणार आहे.
संघ रचना आणि नियमावली
प्रत्येक संघात १५ खेळाडू, १ प्रशिक्षक आणि १ व्यवस्थापक असे १७ सदस्य सहभागी होऊ शकतात. विशेषतः, महिला संघांसाठी महिला व्यवस्थापिकेची नेमणूक अनिवार्य आहे.
राज्य संघटनेचे विशेष आवाहन
राज्यातील सर्व जिल्हा संघांनी या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर, सचिव प्रा. डॉ. चंद्रजित जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अॅड. गोविंद शर्मा यांच्यासह सर्व सहसचिवांनी केले आहे.
राज्यभरातील उच्च खेळ करणाऱ्या खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर झेप घेण्याची सुवर्णसंधी देणारी ही स्पर्धा खेळाडूंसाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे खो-खो रसिकांसाठी शेवगावमध्ये या रोमांचक सामन्यांचा थरार अनुभवण्याची संधी असणार आहे!