लग्नात डिजे वाजविल्यास वधुवरासह डीजे चालक मालक आणि मंगल कार्यालयावर फौजदारी गुन्हे! काही जणांना थेट पोलिसांच्या नोटीसा?

लग्नात डिजे वाजविल्यास वधुवरासह डीजे चालक मालक आणि मंगल कार्यालयावर फौजदारी गुन्हे! काही जणांना थेट पोलिसांच्या नोटीसा?

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) लग्नसराईचा मुहूर्त पाहून उन्हाळ्यात लग्नाचे बार उडवून देण्याचा सपाटा अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वत्र धुमधडाक्यात सुरू झाला असल्याचे पहावयास मिळत आहे.सर्वत्र होणाऱ्या डीजेच्या आवाजास लगाम घालण्यासाठी अहिल्या नगर जिल्ह्यातील पोलिसांनी कठोरपणे पाउले उचलली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंतच अतिशय कमी आवाजात डीजे वाजला पाहिजे.पण या सरकारी आदेशाला केराची टोपली दाखवून अनेक वधुवर आणि डीजे चालक मालक लग्नाच्या नावाखाली डीजेच्या कर्कश आवाजात सर्वत्र स्वैराचाराने हैदोस आणि धुडगूस घालत आहेत. असे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.या डीजेच्या आवाजामुळे अनेक ठिकाणी आजारी लोकांना भयंकर यातना भोगायला लागत आहेत.त्यामुळे डीजे वाजायला बंदी घालण्यात आली आहे.याचा वधू आणि वरा कडील लोकांनी एकत्रितपणे विचार केला पाहिजे पण तसे होताना दिसत नाही.म्हणून रात्री दहा नंतर डीजे वाजल्यास संबंधित डीजे चालक मालक आणि मंगल कार्यालयाचे चालक मालक आणि वधुवर आणि त्यांचे माता पिता यांच्या वर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा नगरशहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांनी दिला आहे.अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक रॉकेशजी ओला साहेब यांच्या आदेशानुसार पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी अहिल्या नगर शहरातील तोफखाना विभागातील पोलिस स्टेशनमध्ये सर्व मंगल कार्यालयाचे चालक मालक,मॅनेजर,आणि डीजे चालक मालक मॅनेजर यांच्या स्वतंत्र बैठका घेऊन त्यांना सुचनाही दिलेल्या आहेत तर काहींना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.अहिल्यानगर जिल्ह्यात आणि शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर स्वतंत्र मंगलकार्यालये आहेत.सध्या लग्नसराईचा मुहूर्त असल्याने मंगल कार्यालय परीसरात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढलेल्यामुळे जागोजागी वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे. लग्नाचे हळदी समारंभ हे रात्री उशिरापर्यंत असतात त्यामुळे फटाक्यांच्या आतषबाजीत हे डीजे जोरजोराने वाजवून सार्वजनिक जीवनातील शांततेचा भंग करीत आहेत.त्यामुळे परीसरातील नागरीकांना शांतपणे झोपा येत नाहीत.दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना शांत डोक्याने अभ्यास करता येत नाही.या आवाजामुळे जेष्ठ नागरिकांच्या शारीरिक समस्या निर्माण होतात.लहान बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कानाचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या गोरं गरीबांच्या झोपडीची पत्रे या आवाजाने जोरजोराने हादरत आहेत.या डीजेंच्या विरोधात जिल्ह्यातील पोलिसांकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिस ॲक्शन मोडवर आलेले आहेत.

जिल्ह्यातील पोलिस दलातर्फे सर्वत्र या टेहळणीसाठी स्वतंत्र पोलिस पथके नेमण्यात आली आहेत.डीजेचा आवाज, वाहतुकीची कोंडी, आणि जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशा स्वरूपात लेखी सुचनाही सर्वच मंगल कार्यालयांना दिलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच डीजेचा आवाज असला पाहिजे. असं सर्वांना सांगण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास डीजे चालक, मंगल कार्यालय,मालक आणि वधुवरासह त्यांच्या माता पित्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.असे आवाहन अहिल्यानगर शहर उपअधीक्षक अमोल भारती यांनी केले आहे.आज नगर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्रास डीजे चालक मालक या आवाजाच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करताना दिसत आहेत. तेव्हा डीजे चालक मालक आणि मंगल कार्यालय मालकासह वधुवरांचे हौसे,नवसे,गवसे, पेताडमित्र व माता पित्यांनी याची गंभीरपणे दखल घ्यावी असेही कळविण्यात आले आहे. नाही तर वधुवरांच्या शुभविवाहात एकमेकांच्या गळ्यात फुलांच्या शुभमाळा न पडता, लग्नाच्या बेडी ऐवजी हातात पोलिसांच्या बेड्या पडणार आहेत.याची वधुवरांनी आणि त्यांच्या पालकांनी नोंद घ्यावी.नाही तर सर्वांच्या साक्षीने भर मांडवात वधुवरांच्या हातात लग्नाच्या बेडी ऐवजी पोलिसांची बेडी निश्चितच ठरलेली आहे.