खो-खो खेळाच्या प्रगतीसाठी मोठे पाऊल बालेवाडी क्रीडांगण होणार अद्ययावत – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

खो-खो खेळाच्या प्रगतीसाठी मोठे पाऊल बालेवाडी क्रीडांगण होणार अद्ययावत – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

 

पुणे, २५ जानेवारी: खो-खो खेळाच्या विकासासाठी तसेच खेळाडूंना सर्व अद्ययावत सुविधा पुरवण्याचा निर्धार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि खो-खोचे प्रमुख आश्रयदाते अजितदादा पवार यांनी व्यक्त केला आहे. बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील खो-खोचे मैदान आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज केले जाईल असे त्यांनी आश्वासन दिले.

 

नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघांनी विजेतेपद पटकावले. या संघातील महाराष्ट्राच्या खेळाडू, प्रशिक्षक, आणि पदाधिकाऱ्यांचा पुण्यात सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात अजितदादा पवार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

 

प्रभावशाली सहभाग आणि कौतुकाचा वर्षाव

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजित जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार गोविंद शर्मा, माजी सचिव संदीप तावडे तसेच खेळाडू प्रतिक वाईकर, सुयश गरगटे, रामजी कश्यप, आदित्य गणपुले, प्रियांका इंगळे, अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड, वैष्णवी पोवार यांचा सत्कार करण्यात आला. प्रशिक्षक शिरीन गोडबोले, प्राची वाईकर, आणि फिजिओ डॉ. अमित रव्हाटे यांनाही सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात बोलताना अजितदादांनी सांगितले की, “महाराष्ट्राचे खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत. खेळाडूंच्या मेहनतीला साथ देण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. खो-खो मैदानांचे आधुनिकीकरण हे त्याचाच एक भाग आहे.”

________________________________________

केंद्रीय मंत्र्यांकडूनही सन्मान

शनिवारी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही संघातील खेळाडू, प्रशिक्षक, फिजिओ आणि पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार केला. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आणि भविष्यातील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

________________________________________

पुणे श्रमिक पत्रकार संघाकडूनही सन्मान

आज पुणे श्रमिक पत्रकार संघाकडूनही संघातील खेळाडू, प्रशिक्षक, फिजिओ आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार नवी पेठ पुणे येथील संघाच्या कार्यालयात केला यामुळे खेळाडू पूर्णपणे भारावून गेल्याचे दिसत होते.

________________________________________

जंगी स्वागताने वाढवली उत्सवाची शोभा

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनतर्फे शुक्रवारी सायंकाळी विमानतळावर संघातील खेळाडूंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. बँडवादन, पुष्पगुच्छ, आणि जल्लोषाने खेळाडूंना मानाचा मुजरा देण्यात आला.

 

खो-खोच्या भविष्याला नवे पंख

भारतीय संघाच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर महाराष्ट्र सरकारकडून खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. बालेवाडी येथील अद्ययावत मैदान भविष्यातील खेळाडूंना उत्तम सुविधा उपलब्ध करून देईल आणि खो-खोला जागतिक स्तरावर नवे आयाम मिळवून देईल.