मा. शंकरजी गायकर साहेब आणि डॉ. विश्वासराव आरोटे यांची महत्त्वपूर्ण भेट

मा. शंकरजी गायकर साहेब आणि डॉ. विश्वासराव आरोटे यांची महत्त्वपूर्ण भेट: गोमाता संरक्षण, महिला सन्मान आणि समाजसुधारणेवर विचारमंथन!

 

ब्राम्हणवाडा, प्रतिनिधी (अकोले तालुका):

आज ब्राम्हणवाडा गावाने एक ऐतिहासिक क्षण अनुभवला. विश्व हिंदू परिषद केंद्रीय सह मंत्री आणि राष्ट्रीय प्रवक्ता माननीय श्री. शंकरजी गायकर साहेब आपल्या गावी ब्राम्हणवाडा येथे आले होते यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ राज्य सरचिटणीस आणि दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा केली.

 

डॉ. विश्वासराव आरोटे यांना नुकताच “पत्रकार भूषण पुरस्कार २०२५” प्रदान करण्यात आला होता. याबद्दल मा. शंकरजी गायकर साहेब यांनी त्यांचा सत्कार करत त्यांचे अभिनंदन केले. या भेटीमुळे समाजाच्या विकासासाठी पुढील दिशा आखण्यासाठी महत्त्वाचे विचारमंथन घडले.

 

गोमातेच्या संवर्धनावर विशेष चर्चा,

शंकरजी गायकर साहेबांनी गोमातेच्या महत्त्वावर सखोल विचार मांडले. ते म्हणाले, “गोमाता ही केवळ आपली संस्कृतीच नव्हे, तर आपल्या कृषीप्रधान देशाचा आत्माही आहे. गोमातेचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. तिचे पालन-पोषण फक्त दुधासाठी न करता, संपूर्ण जबाबदारीने केले पाहिजे.”

 

गोमातेच्या संरक्षणासाठी प्रयत्न,

गायकर साहेबांनी त्यांच्या संघर्षाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, २०१५ मध्ये मोदी सरकारच्या काळात गोहत्या बंदीचा कायदा लागू झाला. यासाठी आम्ही अनेक आंदोलनं केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात नागपूर अधिवेशनात गोसेवा आयोग स्थापन करण्यासाठी आम्ही प्रखर आंदोलन केले.”

 

त्यांनी असेही नमूद केले की, गोमाते पुढे कोणतेही सरकार असो, आम्ही गोमातेच्या संरक्षणासाठी सदैव झटत राहू. हिंदुस्तान कृषीप्रधान देश आहे आणि गोमाता ही त्या देशाच्या भरभराटीचा आधार आहे. प्रत्येक शेतकऱ्याने गावठी गायींचे पालन केले पाहिजे. गायींना जंगलात सोडून न देता, त्यांचे योग्य पालन करून शेतकरी आपले जीवन अधिक समृद्ध करू शकतो.”

 

हिंदू परंपरा आणि गोमातेचे स्थान,

गायकर साहेबांनी हिंदू धर्मामध्ये गोमातेचे असलेले महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “पूर्वीच्या काळात मुलीच्या लग्नात गोदान करण्याची प्रथा होती. याचा अर्थ गोमातेच्या माध्यमातून मुलीला तिच्या आईच्या मायेचा अनुभव मिळावा, असा होता. गोमाता ही आपल्या कुटुंबाचा आणि संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत हिंदू धर्मात गोमातेचे स्थान अबाधित आहे.”

 

महिलांच्या सन्मानासाठी आवाहन,

गायकर साहेबांनी महिला सन्मान आणि समानतेचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, आपल्या समाजात महिलांना माता-भगिनी म्हणून मानाचे स्थान मिळाले पाहिजे. विधवा, परित्यक्ता, सौभाग्यवती यामध्ये कोणताही भेदभाव करता कामा नये.”

 

त्यांनी एक महत्त्वाचे उदाहरण दिले की, मी एका कार्यक्रमात हिंदू आणि मुस्लिम महिलांचे एकत्र पूजन केले होते. यामुळे समाजातील समरसता टिकवण्यासाठी मोठा संदेश जातो.

 

स्त्री सन्मानासाठी प्रेरणा,

त्यांनी राणी तारामती यांचे उदाहरण देत सांगितले की, “स्त्रिया आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा आधारस्तंभ आहेत. त्यामुळे त्यांच्या सन्मानासाठी प्रत्येकाने जागरूक राहिले पाहिजे. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये महिलांना प्राधान्य दिले पाहिजे.”

 

भेटीचे परिणाम आणि चर्चा विषय,

या भेटीदरम्यान गोमाता संरक्षण, कृषी सुधारणा, हिंदू संस्कृती, आणि समाजातील स्त्रियांच्या सन्मानासाठी अनेक उपाययोजना सुचवण्यात आल्या. शंकरजी गायकर साहेबांनी गोमातेच्या कायद्याचे महत्त्व पटवून दिले आणि यासाठी सरकारवर कसा दबाव आणावा, यावर मार्गदर्शन केले.

 

डॉ. विश्वासराव आरोटे यांनीही पत्रकारितेच्या माध्यमातून समाज प्रबोधनासाठी योगदान देण्याचे वचन दिले. त्यांनी सांगितले, “गोमाता संरक्षण, समाज सुधारणा, आणि महिला सन्मान यांसाठी आपण नेहमी तत्पर राहू.”

 

ब्राम्हणवाडा गावात झालेली ही भेट सामाजिक, सांस्कृतिक, आणि धार्मिक एकात्मतेचा संदेश देणारी ठरली. गोमातेच्या संवर्धनासाठी, महिलांच्या सन्मानासाठी, आणि समाजाच्या विकासासाठी ही भेट प्रेरणादायी ठरली आहे.