धाराशिव, सोलापूर, सांगली दोन्ही गटात उपांत्य फेरीत

धाराशिव, सोलापूर, सांगली दोन्ही गटात उपांत्य फेरीत

 

सुवर्ण महोत्सवी राज्य कुमार व मुली खो-खो स्पर्धा : पुणे व ठाणेही उपांत्य फेरीत लढतील

 

धाराशिव, दि. २९ ऑक्टोबर-

 

सुवर्ण महोत्सवी ५० वी कुमार व मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेत यजमान धाराशिवसह सोलापूर व सांगली या जिल्ह्याच्या कुमार व मुली संघांनी दोन्ही गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला. कुमार गटात पुणे व मुलींच्या गटात गटात ठाणे जिल्ह्यानेही उपांत्य फेरी गाठली.

 

महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व उस्मानाबाद जिल्हा खो खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत कुमार गटात पुणे विरुद्ध ठाणे हा सामना वगळता तिन्ही सामने एकतर्फी झाले. पुण्याने ठाण्याचा १४-१२ असा दोन गुण चार मिनिटे राखून पराभव केला. भावेश माशेरे (२.२०, १.१० मि. व ३ गुण) व विलास मालुसरे (२.२०, १.४०मिनिटे संरक्षण ) हे त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले. ठाण्याच्या आशिष गौतम (१.२०,२.००मि. व २ गुण ) याची लढत अपुरी पडली

 

दुसऱ्या सामन्यात सोलापूरने अहिल्यानगरवर ११-९ असा एक डावाने दणदणीत विजय मिळविला. त्यांच्या सुजित मेटकरी (३,१.१० मि.व २ गुण ) व फराज शेख (१.५० मि. ३ गुण)यांनी अष्टपैलू खेळी केली. कर्णधार कृष्णा बनसोडेने(३.२० व २.४० मि.) संरक्षणाची शानदार खेळी केली. अहिल्यानगरकडून अनेक वाल्हेकर (२.१० मि.) व कृष्णा कपनर (४) यानी लढत दिली.

 

तिसऱ्या सामन्यात सांगलीने नाशिकवर ११-८ अशी डावाने एकतर्फी मात केली. सांगलीकडून अथर्व पाटील याने (२.४० मि. व २गुण )अष्टपैलू खेळ केला. प्रज्वल बनसोडे व सुजल माने यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. नाशिककडून म्हणून वाळवणे (१.४० मि. २ गडी) याचे प्रयत्न अपुरे पडले.

 

चौथ्या सामन्यात हरद्या वसावेच्या अष्टपैलू खेळामुळे धाराशिवने मुंबईचा १५-६ असा डावाने धुव्वा उडविला. त्याने पहिल्या डावात ३.३० मि. नाबाद व दुसऱ्या डावात १.४० मिनिटे संरक्षण करीत आक्रमणात चार गडी बाद केले. विलास वळवी याने चार मिनिटे पळती करीत संरक्षणाची बाजू सांभाळली. मुंबईकडून श्रेयस सौंदलकर (१.२०मि.) व सुजल शिंत्रे (१.१० मि.) हे वगळता त्यांचा एकही खेळाडू मैदानावर तग धरू शकला नाही.

—–

*पिछाडीवरून सोलापूरची नाशिकवर मात*

 

मुलींच्या गटात नाशिक विरुद्ध सोलापूर हा सामना अत्यंत चूरशीचा झाला. मध्यंतराच्या ४-७ अशा पिछाडीवरून सोलापूरने १३-९ अशी चार गुणांनी बाजी मारली. पहिल्या डावात एका मिनिटात बाद झालेल्या स्नेहा लामकाने हिने दुसऱ्या डावात पाच मिनिटे संरक्षणाचा किल्ला लढविला. तिने आपल्या धारदार आक्रमणात पाच गडीही टिपले. कर्णधार साक्षी देठे (२, २.२० मि. व २ गुण) हिनेही अष्टपैलू खेळ करीत तिला साथ दिली. नाशिककडून सुषमा चौधरी हिने (२,२.३०मि. व नाबाद ५० सेकंद) लढत दिली.

——

मुलींच्या गटातील दुसऱ्या सामन्यात धाराशिवने रत्नागिरीवर १४-७ असा डावाने विजय मिळवला. अश्विनी शिंदे हिने ४ तर सुहानी धोत्रे हिने २.२० मि. पळती केली. सुहानीने आपल्या धारदार आक्रमणात पाच गडीही टिपले. रत्नागिरीकडून रिद्धी चव्हाण हिने १.३० मि. पळती व दिव्य पालवेने तीन गडी बाद केले.

 

तिसऱ्या सामन्यात ठाण्याने मुंबई उपनगरला ९-६ असे एका डावाने नमवले. धनश्री कंक हिने चार मिनिट व सांगवी तळवडेकर हिने नाबाद १.३० मिनिटे पळती करीत तीन गडी बाद केले. मुंबई उपनगरच्या दिव्या गायकवाड हिने १.५० मि. संरक्षण व सिया भद्रिकेने तीन गडी बाद केले.

 

चौथ्या सामन्यात सांगलीने पुण्यास ९-५ असे डावाने हरवले. अष्टपैलू खेळी करणारी प्रतीक्षा बिराजदार ही त्यांच्या विजयाची शिल्पकार ठरली. तिने दोन्ही डावात ४ मिनिटे संरक्षण करीत चार गडी बाद केले. पुण्याकडून अक्षरा ढोले १ व १.३० नाबाद अशी संरक्षणाची खेळी केली.

——

*असे होणार उपांत्य सामने*

कुमार : सोलापूर-सांगली, धाराशिव-पुणे.

मुली : धाराशिव-ठाणे, सांगली- सोलापूर.

————-