आश्रमशाळेतील प्रलंबित प्रश्न लवकर मार्गी लावा – आ. सत्यजीत तांबे यांचे निर्देश

आश्रमशाळेतील प्रलंबित प्रश्न लवकर मार्गी लावा!- आ. सत्यजीत तांबे यांचे निर्देश

– आश्रमशाळेच्या प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा

 

 

प्रतिनिधी,

 

आदिवासी विकास विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. प्रलंबित प्रश्न वेळेवर सोडवले जात नसल्याने प्रश्नांबाबत आमदार सत्यजीत तांबे यांनी नाशिक आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांच्यासोबत बैठक घेतली. बैठकीत आश्रमशाळेत कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविधा मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी आश्रम शाळेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार असल्याचे आ. सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

 

आश्रम शाळेच्या नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी न्यायप्रविष्ठ असल्याने ते रद्द करुन आश्रम शाळांचे कामकाज ११ ते ५ या वेळेत पुर्ववत करण्यात यावे. तसेच आश्रम शाळेच्याबाबतीत काम नाही वेतन नाही धोरण करण्यात यावे आणि संच मान्यता या प्रमुख प्रश्नांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. हे प्रश्न तातडीने सोडवण्याचे निर्देश यावेळी आ. सत्यजीत तांबे यांनी दिले.

 

बैठकीत नियुक्ती दिनांकापासुन विशेष बाब म्हणुन मान्यता देण्यात आलेल्या ११५५ शिक्षकांना वेतन थकबाकी अदा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी (GPF), परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना (DCPS / NPS) खात्यावरील अद्ययावत हिशोब मिळणेबाबत आणि सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी देखील चर्चा पार पडली.

 

आश्रम शाळेतील कला, क्रीडा व संगणक शिक्षक यांच्यासाठी २०१८ मध्ये तीन वर्षासाठी कंत्राटी पद्धतीने भरती झाली होती. या शिक्षकांचा सेवा कालावधी तीन वर्षापेक्षा अधिक झाला असून ४ ते ५ वर्ष सेवा झालेली आहे. ५०० शासकीय आश्रम शाळेमध्ये जवळ ८३६ शिक्षक असून २०२३/२४ ह्या शैक्षणिक वर्षात कोणालाच आदेश गेले नाहीत. या सर्व शिक्षकांना आदेश देण्यात यावेत अशी मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी केली.