कपाशीला दहा तर सोयाबीनला साडेसात हजारांचा भाव मिळावा : वैशालीताई सुर्यवंशी

कपाशीला दहा तर सोयाबीनला साडेसात हजारांचा भाव मिळावा : वैशालीताई सुर्यवंशी

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना-उबाठाचे धरणे आंदोलन

 

पाचोरा, दिनांक ११ (प्रतिनिधी ) : कपाशीला प्रति क्विंटल कमीत कमी दहा हजार तर सोयाबीनला साडे सात हजार भाव मिळावा तसेच शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण करावे अशी मागणी वैशालीताई सुर्यवंशी यांनी केली. त्या शिवसेना-उबाठाच्या वतीने आयोजीत धरणे आंदोलनात बोलत होत्या.

 

आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयाच्या समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून निघाला. उपस्थितांनी यातून केंद्र व राज्य सरकारचा निषेध केला.

 

याप्रसंगी वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपल्या भाषणातून सरकारविरोधी धोरणांवर कडाडून टिका केली. त्या म्हणाल्या की, शेतकरी हा आपल्या समाजातील महत्वाचा घटक असला तरी त्याच्या कृषी उत्पादनाला वाजवी भाव भेटत नाही. कपाशी व सोयाबीनला भाव नाही. या दोन्ही पिकांना अनुक्रमे दहा व साडेसात हजार रूपयांचा भाव मिळावा अशी मागणी त्यांनी केली. मका, उडीद, मूग आदी पिकांचे मूल्य निर्धारीत करून शासकीय खरेदी सुरू करावी, याच प्रमाणे अन्य पिकांनाही यथोचीत भाव मिळावा असे त्यांनी नमूद केले. यासोबत विविध योजनांचे लाभ व पिकांची नुकसान भरपाई व अनुदान मिळण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच, जुनी पेन्शन योजना लागू करून कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा असेही त्यांनी याप्रसंगी नमूद केले.

 

आजच्या आंदोलनात शिवसेना-उबाठा पक्षाचे ज्येष्ठ नेते उध्दव मराठे, अरूण पाटील, अभय पाटील, रमेश बाफना, भरत खंडेलवाल, अनिल सावंत, गजू पाटील, राजेंद्र पाटील, पप्पू जाधव, दीपक पाटील, राजेंद्र राणा, अभिषेक खंडेलवाल, संदीप जैन, बंटी हटकर, तिलोत्तमा मौर्य, गजू सावंत, आकाश पाटील, संतोष पाटील, निलेश पाटील, गौरव पाटील, अरमान तडवी, विकास वाघ, खंडू सोनवणे, भागवत पाटील, मनोज चौधरी, राजू काळे, अप्पा परदेशी, जयसिंग पाटील, गुरूलाल पवार, राजेंद्र पाटील, रसूल पिंजारी, कुंदन पांड्या आदींसह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

लाल लाल पागोटं गुलाबी शेला !

 

या आंदोलनात जोरदार घोषणाबाजी करतांनाच उपस्थितांनी हातात टाळ घेऊन म्हटलेली विनोदी गाणी लक्षणीय ठरली. यात लाल लाल पागोटं गुलाबी शेला. . . महागाई वाढवणारा मेला त्याच्या मौतीला चला ॥ या गाण्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. टाळाच्या तालावर आंदोलकांनी केंद्र व सरकारचा निषेध केला.