सत्ताधाऱ्यांनी आधी लाडक्या बहिणींसाठी शौचालये बांधावीत : वैशालीताई सुर्यवंशी

सत्ताधाऱ्यांनी आधी लाडक्या बहिणींसाठी शौचालये बांधावीत : वैशालीताई सुर्यवंशी

नांद्रा येथील शेतकरी मेळाव्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल

 

पाचोरा, दिनांक २० (प्रतिनिधी ) : पाचोरा मतदारसंघात बहुतांश गावांमध्ये कोणतीही कामे झालेली नाहीत. गावोगावी तर शौचालयाच्या मोठ्या समस्या आहेत. यामुळे सत्ताधाऱ्यांनी लाडक्या बहिणींसाठी आधी शौचालये बांधावीत ! असा टोला लगावत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी आजच्या नांद्रा येथील शेतकरी मेळाव्यात जोरदार टिकास्त्र सोडले.

 

शिवसेना-उबाठाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्या शेतकरी शिवसंवाद यात्रेच्या अंतर्गत आज नांद्रा येथील आई तुळजाभवानी मंदिर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात जैन इरिगेशनचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ तथा कृषी विस्तार व प्रशिक्षणाचे प्रमुख डॉ. बी.डी. जडे यांनी उपस्थितांना अत्याधुनीक शेतीबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकऱ्यांना जमीनीचा पोत कायम राहण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसह विविध महत्वाच्या विषयांवर मागदर्शन केले.

 

यानंतर वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून विविध विषयांना स्पर्श केला. त्या म्हणाल्या की, मी आरोप-प्रत्यारोपांबाबत बोलत नाही, तथापि, योग्य वेळ आल्यास मी नक्कीच याबाबत बोलणार आहे. आपल्या मतदारसंघाला गतवैभव मिळावे यासाठी मी प्रयत्नशील आहे. मतदारसंघात पिण्याचे पाणी व सिंचनाचे प्रश्न तसेच अनेक समस्या असतांना यांचे निराकरण करण्याचे कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. तात्यासाहेबांचे सर्व स्वप्न पूर्ण करण्याला माझे प्राधान्य राहणार आहे. यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करेल ही ग्वाही याप्रसंगी देत आहे. बहुतांश गावांमध्ये शौचालयाच्या समस्या असून सत्ताधाऱ्यांनी लाडक्या बहिणींसाठी आधी शौचालये बांधावीत असा टोला देखील त्यांनी मारला. पाचोरा मतदारसंघात दोन्ही विरोधी उमेदवारांमध्ये अनेक बाबतीच तडजोड असून याचे प्रतिबिंब आपल्याला नगरपालिका, बाजार समिती येथे दिसून येत आहे. या तडजोडीला दूर सारून विकास करावयाचा असेल तर याला परिवर्तन हाच एकमेव पर्याय असल्याचे प्रतिपादन वैशालीताई सुर्यवंशी यांनी याप्रसंगी केले.

 

याप्रसंगी व्यासपीठावर उध्दव मराठे, अभय पाटील, अरुण पाटील, शरद पाटील, अनिल सावंत, राजेंद्र पाटील, मनोज चौधरी, गजू पाटील, डॉ. अस्मिता पाटील, तिलोत्तमा मौर्य, योजना पाटील, लक्ष्मी पाटील, संदीप जैन, दादाभाऊ पाटील, ज्ञानेश्वर पाटील, राजेंद्र देवरे, राजेंद्र राणा, रवींद्र पाटील, देवा पाटील, बाळू पाटील, नितीन महाजन, मोहन पाटील, हरून शेख, शशिकांत बोरसे, जडे सर, सागर वाघ, रवींद्र पाटील, बंडू पाटील, निखिल भुसारे, संतोष पाटील, राजू पाटील, अरुण तांबे, जयश्री येवले, अनिता पाटील, मनीषा पाटील, बेबा ताई पाटील, एकनाथ महाराज आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. नाना वाघ यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक व आभार विनोद बाविस्कर यांनी केले

 

या मेळाव्याला परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांसह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.