चोपडा महाविद्यालयात ‘मानसिक स्वास्थ्य व निरोगी मानसिक आरोग्याची आवश्यकता’ या विषयावरील व्याख्यान संपन्न

चोपडा महाविद्यालयात ‘मानसिक स्वास्थ्य व निरोगी मानसिक आरोग्याची आवश्यकता’ या विषयावरील व्याख्यान संपन्न

 

चोपडा: येथे महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक तसेच राजीव एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन एज्युकेशन विंग ब्रह्माकुमारीज, माउंट अबू (राजस्थान) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘निरोगी मानसिक आरोग्याची आवश्यकता’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी हे उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे नोडल ऑफिसर प्रा.विकास भाई साळुंखे तसेच ब्रह्माकुमारीज विश्वविद्यालयाच्या मंगला दीदी, सारिका दीदी, पंकज भाई, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, सौ.एम.टी.शिंदे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. विकासभाई साळुंखे ‘निरोगी मानसिक आरोग्याची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले की, सन १९३७ पासून ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय संपूर्ण जगात तसेच १४२ देशांमध्ये समाजाचे मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहे.२२ विद्यापीठांमध्ये कोर्सेस सुरू केले असून मानसिक स्वास्थ्य कसे टिकवता येईल, यावर मार्गदर्शन केले जाते. आज ९०% आजार नैराश्येतून होतात त्यामुळे माणसाला मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी ताणतणाव, नैराश्येतून बाहेर पडले पाहिजे.मोबाईल वरील विविध गेम्समुळे तरुणाईचे मानसिक स्वास्थ बिघडले आहे. तो व्यसनाधिनकडे जात आहे. त्यामुळे मानसिक स्वास्थ टिकून ठेवण्यावर आज भर दिला पाहिजे. वाढत्या अपेक्षेतून नैराश्य येते म्हणून भावनात्मकता व बुद्धिमत्ता यांचा समतोल साधावा. शारीरिक स्वास्थ्य, भावनात्मकता, वित्तीय ज्ञान व सामाजिक स्वास्थ या बाबी जोपासल्यास आपला विकास होईल. मानसिक स्वास्थ्यासाठी व्यायाम, योग्य आहार, मनन, चिंतन व मूल्यशिक्षण या गोष्टी आवश्यक असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.

याप्रसंगी पंकज भाई यांनी मानसिक स्वास्थ्य विषयीचे ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयातर्फे व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे चालवल्या जाणाऱ्या विविध कोर्सेसची माहिती विद्यार्थ्यांना दिली.

याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी म्हणाले की, ‘ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय, माउंट आबू येथे मानसिक आरोग्य टिकविण्यासाठीचे व आपल्या मन परिवर्तनाचे विविध कोर्सेस शिकविले जातात. विद्यार्थ्यांसाठी मानसिक स्वास्थ्य टिकवणारे कार्यक्रम आयोजित करणे महत्त्वाचे असून तरुणांचे मानसिक स्वास्थ टिकवून ठेवणे आवश्यक आहे. माणसाचे मानसिक स्वास्थ्य चांगले असेल तर त्यातून सामाजिक स्वास्थ्य चांगले टिकून ठेवून त्यातून चांगला समाज घडविता येईल.’

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ.मधुचंद्र भुसारे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. ए.एच. साळुंखे, सौ.आर.पी.जयस्वाल, वाणिज्य व व्यवस्थापन विभागातील प्राध्यापक बंधू- भगिनी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू- भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.