पाचोऱ्यात शिवसेना-उबाठा आक्रमक : शिवरायांच्या पुतळा विटंबनेचा निषेध

पाचोऱ्यात शिवसेना-उबाठा आक्रमक : शिवरायांच्या पुतळा विटंबनेचा निषेध

टक्केवारीवाल्या राज्य सरकारने राजीनामा द्यावा : वैशालीताई सुर्यवंशी

 

पाचोरा, दिनांक २७ (प्रतिनिधी ) : राज्य सरकारला फक्त टक्केवारीत रस असल्याने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाली असून ही बाब वेदनादायी आहे. या सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी केली. त्या शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आयोजीत निषेध आंदोलनात बोलत होत्या.

 

राज्य सरकारने आठ महिन्यापूर्वी उभारलेल्या ३५ फुटाचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. याच मुद्यावरून आज पाचोऱ्यात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार घोषणाबाजी करत घटनेप्रकरणी निषेध व्यक्त करण्यात आला. यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.

 

याप्रसंगी पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी राज्य सरकारवर कडाडून टिका केली. त्या म्हणाल्या की, महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याची घटना ही अतिशय निंदनीय अशीच आहे. राज्य सरकारला फक्त टक्केवारीत रस असल्यामुळे कुठे पैसे खावेत आणि कुठे नाही हे देखील त्यांना उमजत नाही. यातूनच शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची बाब भयंकर असून याचा करावा तितका निषेध कमीच आहे. यामुळे मराठी जन संतापले असून राज्य सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी देखील वैशालीताई सुर्यवंशी यांनी याप्रसंगी केली.

 

यावेळी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी, अभय पाटील, हरीभाऊ पाटील, भरत खंडेलवाल, खंडू सोनवणे, पप्पू राजपुत, रसूलचाचा, पप्पू जाधव, गजू पाटील, गफ्फार शेख, गजानन सावंत, संदीप जैन, मनोज चौधरी, बंटी हटकर, बंडू मोरे, निखील सोनवणे, गजानन सावंत, नितीन खेडकर, द्वारकाबाई सोनवणे, धनराज रघुनाथ पाटील, निर्भय मोरे, ऋषिकेश ढोले, अभय पवार, किरण पाटील,अमोल महाजन, देविदास सावडे यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.