पाथर्डी तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचा जिल्हा कार्यकारीणी सदस्यत्वाचा राजीनामा

पाथर्डी तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचा जिल्हा कार्यकारीणी सदस्यत्वाचा राजिनामा

 

(सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) भाजपाचे माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या लोकसभेतील झालेल्या पराभवानंतर पाथर्डी तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच चलबिचल सुरू झाली आहे.एका जिल्हा कार्यकारिणी सदस्यांने आपल्या पदाचा राजिनामा थेट उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,शिवाजीराव कर्डिले यांच्या कडे सुपुर्द केला आहे. त्या राजिनाम्याची एक प्रत अहमदनगर जिल्हा अध्यक्ष दिलीप भालसिंग यांनाही पाठविण्यात आली आहे. भाजपाचे माजी आमदार आणि जिल्हा बँकेचे चेरमन शिवाजी राव कर्डिले यांचे खंदे समर्थक असलेले आणि पाथर्डी तालुक्यातील सातवड येथील रहिवासी असलेले महादेव ऊर्फ(बंडू) नानासाहेब पाठक यांनी आपला जिल्हा कार्यकारिणी सदस्यत्वाचा राजिनामा भाजपाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष दिलिप भालसिंग यांच्या कडे पाठविला आहे. त्याच्या प्रती उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, आणि जिल्हा बँकेचे चेरमन माजी आमदार शिवाजी राव कर्डिले यांच्या कडे पाठविल्या आहेत. त्या राजिनामा पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की मी भारतीय जनता पार्टीत वीस वर्षापासून कार्यरत आहे.पक्षाने दिलेली जबाबदारी मी आजपर्यंत निष्ठेने पार पाडली आहे.पक्षाने माझ्यावर दाखविलेला विश्वास त्याबद्दल मी पक्षाचा आभारी आहे.मी माझ्या वैयक्तिक कारणांमुळे भाजपच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्यत्वाचा राजिनामा देत आहे.माझा राजिनामा स्विकारून पक्षासाठी दुसऱ्या चांगल्या व्यक्तीची निवड करून पक्ष वाढीसाठी फायदा करून घ्यावा.यासाठी मी हा माझा राजिनामा देत आहे. जिल्हा अध्यक्ष यांनी हा राजिनामा स्विकारावा म्हणून सदर राजिनामा पत्रात विनंती करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षापूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकीत उमेदवारी देताना भाजप नेतृत्वाने जाणीव पुर्वक बंडू पाठक यांना डावलले होते तशी खंत ही त्यांनी अनेक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना बोलून दाखवली होती. नंतर माजी आमदार कर्डीले साहेब यांनी त्याची नाराजीही दुर केली होती. पण तो वरवरचा देखावा होता असा समज झाल्यामुळेच पाठक यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजिनामा दिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार निलेशजी लंके साहेब हे बंडू पाठक यांच्या घरी चहापानासाठी गेले होते.त्याचवेळी बंद खोलीत चर्चा होउन हा डाव टाकला असल्याचे दिसून येत आहे.ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राजिनामा म्हणजे भाजपाला राहुरी-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपला चांगली चपराक असुन विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या द्रुष्टीने ही जमेची बाजू आहे.अजूनही काही जण राजिनामा देण्यासाठी उत्सुक आहेत. अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे. या राजिनाम्यामुळे भाजप मधिल सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आली आहे. जिल्हा अध्यक्ष नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.