नंदुरबारच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी विशेष प्रयत्न करणार – आ. सत्यजीत तांबे
– शिक्षणक्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांचा घेतला आढावा
प्रतिनिधी, नंदुरबार
शिक्षणक्षेत्रातील प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे आ. सत्यजीत तांबे यांनी सोमवारी नाशिक सत्यजीत तांबेंनी गुरुवारी नंदुरबार येथील जिल्हा परिषद येथे बैठक घेतली. या बैठकीत भरती प्रक्रियेसोबत प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाशी निगडित, शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. प्रलंबित असणारे प्रश्न तातडीने सोडवण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी नंदुरबारच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे आमदार सत्यजीत तांबेंनी सांगितले.
नंदुरबार जिल्हा परिषद येथे झालेल्या बैठकीत आ. तांबे यांनी शिक्षकांसह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या. शिक्षकांच्या वैयक्तीक अडचणीबाबतही चर्चा घडवून आणण्यात आली. सेवाज्येष्ठता, विषय शिक्षकांचं समायोजन, भरती प्रक्रिया, संच मान्यता, जिल्हा अंतर्गत बदली, वेतन व सेवानिवृत्तीबाबतच्या अडचणी अशा मुद्दयांवर चर्चा झाली. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्थानिक स्तरावर कार्यवाही करण्याच्या सूचना आ. सत्यजीत तांबेंनी प्रशासनाला दिल्या. त्याचबरोबर प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन आ. तांबेंनी दिले.
सध्या पाचव्या वेतन आयोगानुसार मिळत असलेला आदिवासी प्रोत्साहन भत्ता इतर विभागाप्रमाणे शालेय शिक्षण विभागाला देखील सातव्या वेतन आयोगानुसार मिळावा. तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता वाढल्याने संस्थेने शिक्षकपदी नेमणूक केली असल्यास विनाअट नेमणूकीस मान्यता देण्यात यावी आणि एका संस्थेतून दुस-या संस्थेत कर्मचारी घेण्यास तयार असेल तर विनाअट मान्यता मिळावी यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले पाहिजेत. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावावर शिक्षणाधिकाऱ्यांच्या सहीसाठी दिरंगाई होते. त्यामुळे वेळेत तपासणी करून प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करवा, अशा प्रमुख प्रश्नांवर बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी, मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी वंदना वळवी, उपशिक्षण अधिकारी डॉ. युनूस पठाण वेतन अधीक्षक प्रमोद पाटील तसेच संबंधित अधिकारी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.