आदिवासी तरुणांना न्याय मिळवून देणार – आ. सत्यजीत तांबे
– पेसातील पात्रताधारकांचे बेमुदत उपोषण
– आ. तांबे घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट
प्रतिनिधी,
शासकीय नोकर भरतीसंदर्भातील न्याय मागण्यांसाठी आदिवासींच्या १७ संवर्ग पेसा पदभरती कृती समितीतर्फे उपोषण करण्यात येत आहे. शासनाने संवर्ग भरतीबरोबरच पेसाभरतीही कायमस्वरूपी करावी, तात्पुरत्या किंवा कंत्राटी भरती करू नये, या प्रमुख मागणीसाठी आदिवासी विभागातील पात्रताधारक तरुण आणि तरुणींनी हे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आमदार सत्यजीत तांबेंनी या उपोषण कर्त्यांची भेट घेतली. आदिवासी १७ संवर्गातील पेसा पदभरती संदर्भात सुरु असलेल्या बेमुदत आमरण उपोषणातील सर्व आदिवासी तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे आश्वासन आ. सत्यजीत तांबेंनी दिले.
आ. सत्यजीत तांबे यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन तब्येतची चौकशी केली व तात्काळ जिल्हाधिकारी जलाल शर्मा यांच्याशी संपर्क साधून आंदोलनाची दखल घेण्यास सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिक तहसीलदार यांना उपोषणस्थळी पाठवले आणि उपोषण कर्त्यांचे निवेदन स्वीकारले. त्याचबरोबर उपोषण कर्त्यांची मागणीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करायला सांगितले. १३ जिल्ह्यातून आलेल्या उपोषण कर्त्याना वेळोवेळी मदत करण्याचे, आंदोलनस्थळी पोलीस संरक्षण व आंदोलनातील महिलांना शासकीय विश्रामगृहात रात्रीच राहण्याची व्यवस्था करुन देण्याची मागणी त्यांनी केली. आंदोलन कर्त्यांना जी पण मदत लागेल, ती तात्काळ उपलब्ध करुन देईल व आदिवासी १७ संवर्गातील पेसा पदभरतीतील उपोषण कर्त्यांची मागणीची दखल घेऊन उपोषण करणाऱ्या सर्व तरुणांन न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. तांबेंनी सांगितले.
शासनाच्या सरळसेवेतून भरल्या जाणाऱ्या १७ संवर्गातील काही संवर्गाच्या परीक्षा झाल्या असून, काही प्रलंबित आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थगिती दिल्याने या पदभरतीची पुढील कार्यवाही स्थगित केलेली आहे. मात्र, न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिलेली नाही वा नियुक्ती देऊ नका, असे कुठे म्हटलेले नाही. न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावत पेसा क्षेत्रातील पदभरती थांबविण्यात आल्याचा दावा आंदोलन कर्त्यांनी केला. सरकारकडून या तरुणांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात येत असून एक लोकप्रतिनिधी या नात्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडे आंदोलन कर्त्यांचे प्रश्न मांडून सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आ. सत्यजीत तांबेंनी सांगितले.