लालबुंद रखरखत्या विस्तवावरुन चालण्याची “रहाडयात्रा” हनुमान टाकळी येथे संपन्न,लाखो भाविकांनी घेतले मारुतीचे दर्शन

लालबुंद रखरखत्या विस्तवावरुन चालण्याची “रहाडयात्रा” हनुमान टाकळी येथे संपन्न,लाखो भाविकांनी घेतले मारुतीचे दर्शन

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”अहमदनगर जिल्हा) संपूर्ण देशभर प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र हनुमान टाकळी येथील हनुमान मंदिरा समोर लालबुंद रखरखत्या विस्तवावरून चालत जाण्याची”रहाडयात्रा” मोठ्या उत्साहात संपन्न झाली. शके1576 इ.स.न.(1654) या फाल्गुन महिन्यातील रंगपंचमीच्या दिवशी महान तपस्वी समर्थ रामदास स्वामी यांच्या हस्ते या मारुतीची गाईच्या शेणापासून स्थापना करण्यात आलेली आहे. हनुमानजी परीसरातील भाविकांच्या नवसाला पावू लागले आणि त्या नवसाची नवसपुर्ती करण्यासाठी प्रथम “रहाडयात्रा” आषाढ वद्य चतुर्दशी शके 1577, इ.स.न.(1655) या दिवशी संपन्न झाली होती. तेव्हा पासून आजतागायत अखंडीतपणे ही यात्रा सुरु आहे.या वर्षीची कालची रहाडयात्रा ही आषाढ वद्य चतुर्दशीला म्हणजे शके 1946 इ.स.न. (2024) या तीथीला मोठ्या उत्साहात संपन्न झाली. कालची रहाडयात्रा ही (370) वी यात्रा होती. वरील माहिती ही तिसगावच्या समर्थ रामदास स्वामी स्थापित दिनकर स्वामींच्या मठाचे मठाधिपती महंत प्रकाशबुवा रामदासी यांच्या कडून प्राप्त झाली आहे.याचा उल्लेख प्राचीन काळी लिहलेल्या ग्रंथात आढळतो. समर्थ हनुमान देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महंत रमेशअप्पा महाराज,सचिव सुभाषराव बर्डे, दादा महाराज नगरकर, राहुल राजळे, भाउपाटील राजळे,शामराव भालेराव यांच्या हस्ते या रहाडीची विधीवत पूजा करून रहाड पेटविण्यात आली. बोरीच्या लाकडा पासून बनवलेल्या लालबुंद रखरखत्या विस्तवावरून चालत जाण्याचा पहिला मान बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील बाबासाहेब मारुती लोखंडे वय(34) यांचा आहे. त्यांचे वडील कै.मारुती दगडू लोखंडे यांच्या निधनानंतर त्यांनी अखंडीतपणे आजपर्यंत हे व्रत सुरु ठेवले आहे.त्यांच्या मातोश्री मंडूबाई मारूती लोखंडे वय(76)या ही या यात्रेसाठी आवर्जून उपस्थित होत्या.सेवानिवृत्त वरीष्ठ पोलीस अधिकारी बबनराव दगडखैर,आणि सुभाषराव दगडखैर यांच्या तर्फे यात्रेसाठी आलेल्या भाविकासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांना महाप्रसादाचे वितरण करण्यासाठी शुभम बर्डे, अरुण बर्डे, गोविंद दगडखैर यांनी विषेश सहकार्य केले. रहाडीच्या मुख्य ठिकाणी सोपान गायकवाड, साईनाथ बर्डे, क्रुष्णा काजळे यांनी विषेश सहकार्य केले. या यात्रेसाठी संपूर्ण देशभरातून भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.या यात्रेत कोणत्याही अनुचित प्रकार न होता यात्रा शांततेत पार पडली.हा नवसाला पावणारा मारुती म्हणून संपूर्ण देशभर प्रसिद्ध असुन पंचक्रोशीतील भाविकांच्या ह्रदयातील श्रद्धास्थान बनला आहे.