जळगावकरांचे आमच्या कुटुंबावर विशेष प्रेम – आ. सत्यजीत तांबे 

जळगावकरांचे आमच्या कुटुंबावर विशेष प्रेम – आ. सत्यजीत तांबे

– जळगाव दौऱ्यादरम्यान व्यक्त केल्या भावना

– आमदार झाल्यापासून तांबेंचा २९ वा जळगाव दौरा

– आ. तांबेंनी घेतल्या विविध संस्था व संघटनांच्या भेटी

 

प्रतिनिधी, जळगाव

 

आमदार सत्यजीत तांबे हे सातत्याने मतदारसंघचा दौरा करत असतात. सध्या आ. तांबे जळगावच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या माध्यमातून शहरातील विविध संघटना आणि संस्थांच्या पदाधिकारी यांची भेट घेत आहेत. आ. सत्यजीत तांबे म्हणाले की, ‘जळगाव जिल्ह्याने माझ्या वडिलांना व आमच्या संपूर्ण कुटुंबाला नेहमीच भरभरून प्रेम दिले आहे, असंच निस्सीम प्रेम मलाही प्रत्येक वेळी अनुभवायला मिळतं हे मी माझं भाग्य समजतो’.

 

जळगावच्या दौऱ्यावर असताना जळगाव जिल्हा बार असोसिएशनला भेट देत, वकीलांचे विविध प्रश्न व समस्या जाणून घेतल्या. त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना भेट दिली. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्यांचा आढावा घेतला. आगामी काळात या सर्व समस्या आपण मार्गी लावू, अशा विश्वास आ. तांबेंनी दिला. जळगाव येथील युनोव्हेशन सेंटरच्या कामाची आ. तांबेंनी पाहणी केली. त्याचबरोबर युनोव्हेशन सेंटरच्या कामाला गती देऊन पुढील एक वर्षात काम पूर्ण करण्याचे आदेश अभियंत्यांना दिले. त्याचबरोबर धुळे जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि सहकाऱ्यांच्या निवासस्थानी भेटी देत त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, असे आ. सत्यजीत तांबेंनी सांगितले.

 

आ. सत्यजीत तांबे म्हणाले की, आमदार म्हणून निवडून आल्यानंतर हा माझा २९ वा जळगाव जिल्हा दौरा आहे. दौऱ्यात विविध क्षेत्रातील नागरिकांचे प्रश्न जाणून घेत ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. दौऱ्यादरम्यान त्यांनी शैक्षणिक संस्था व विविध संघटनांच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांची भेट घेतली व त्यांचे प्रश्न आणि समस्या जाणून घेतल्या. यावेळी बोलताना, आपण मांडलेल्या सर्व समस्या आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरु असून यासंदर्भात शासन स्तरावर योग्य तो पाठपुरावादेखील सुरु असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

 

नाशिक पदवीधर मतदारसंघ हा फार व्यापक आहे. ५ जिल्हे ५४ तालुके व ४ हजार हून अधिक गावांचा यात समावेश आहे. याच मतदारसंघातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा तांबे यांचा प्रयत्न सुरु असून टप्प्याटप्प्याने ते संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करत आहेत. आमदार म्हणून निवडून आल्यापासून १५ महिन्यात किमान १ लाख २० हजार किलोमीटरहून अधिक प्रवास केला आहे. इतका प्रवास करूनही थकण्यापेक्षा मला ऊर्जाच मिळत असल्याची भावना आमदार सत्यजीत तांबेंनी याप्रसंगी व्यक्त केली आहे.