वैशालीताई सुर्यवंशींची पंचायत समिती व नगरपालिकेत धडक

वैशालीताई सुर्यवंशींची पंचायत समिती व नगरपालिकेत धडक…

जनतेला नाडणार्‍या कर्मचारी व अधिकार्‍यांना धरले धारेवर…

 

पाचोरा, दिनांक २६ (प्रतिनिधी) : दाखले देण्यात टाळाटाळ करणार्‍या पंचायत समितीच्या अधिकार्‍यांसह पाचोरा शहरातील दैनावस्था दूर करण्यात आलेल्या अपयशामुळे नगरपालिकेत धडक देऊन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी संबंधीतांना चांगलेच धारेवर धरले.

 

सध्या विविध योजनांच्या नोंदणीसाठी पंचायत समितीच्या दाखल्यांची आवश्यकता असून येथे नागरिकांची आणि त्यात देखील महिलांची मोठ्या प्रमाणात अडवणूक होत असल्याच्या तक्रारी सध्या येत आहेत. या पार्श्‍वभूमिवर, आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी त्रास होत असलेल्या स्त्री-पुरूषांसह पंचायत समितीत धडक देऊन दाखले न देणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांची कानउघडणी केली. वेळेत दाखले न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच त्यांनी या संदर्भात गटविकास अधिकार्‍यांशी चर्चा करून तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली.

 

दरम्यान, पावसामुळे पाचोरा शहरातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात असुविधा निर्माण झाल्या असून यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यातच नगरपालिका प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केल्यामुळे पाचोर्‍यात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्‍वभूमिवर, वैशालीताई सुर्यवंशी यांनी नगरपालिकेत धडक दिली. शहरात कामे झाल्याचे सांगण्यात येत असले तरी नागरिकांना सुविधा का मिळत नाहीत ? असा सवाल करत त्यांनी तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली. आणि यावर उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील त्यांनी दिला.

 

याप्रसंगी वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्यासह अभय पाटील, अरूण पाटील, शरद पाटील, अरूण तांबे, संदीप जैन, अभिषेक खंडेलवाल, मनोज चौधरी, हरीश देवरे, पप्पू जाधव, निखील भुसारे, खंडू सोनवणे, हरीभाऊ पाटील, अजय पाटील, संतोष पाटील, समाधान पाटील आदी पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.