रेल्वे प्रश्नाबाबत आ. सत्यजीत तांबेंनी घेतली रेल्वे मंत्र्याची भेट

  1. रेल्वे प्रश्नाबाबत आ. सत्यजीत तांबेंनी घेतली रेल्वे मंत्र्याची भेट

– पुणे – नाशिक सेमी-हाय-स्पीड, अहमदनगर-पुणे रेल्वे प्रकल्पात लक्ष घालण्यची केली मागणी

– नाशिकरोड रेल्वे स्टेशन सुशोभीकरण व वंदे भारत ट्रेनच्या गतीचा मांडला प्रश्न

 

प्रतिनिधी

 

गेल्या अनेक वर्षांपासून उत्तर महाराष्ट्रातील अनेक रेल्वे प्रकल्प अजूनही पूर्ण झालेले नाहीत. या प्रकल्पाबाबत आमदार सत्यजीत तांबेंनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत निवेदन दिले आहे. नाशिक-पुणे सेमी-हाय-स्पीड, अहमदनगर-पुणे रेल्वे प्रकल्प, नाशिकरोड रेल्वे स्टेशन सुशोभीकरण आणि वंदे भारत ट्रेनची गती आणि स्वच्छता याबाबतची मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

 

नाशिक-पुणे सेमी-हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मूळ मार्गात बदल करण्यात आला असून तो संगमनेर, सिन्नर आणि नारायणगाव या पूर्वीच्या मार्गाऐवजी आता शिर्डी येथून जाण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, या प्रकल्पाला विलंब होत आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी कोणी करायची यावर चर्चा सुरू आहे. २५ ते ३० टक्के भूसंपादन प्रक्रिया देखील पूर्ण झाली असून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला देण्यात आला आहे. अशा वेळी प्रकल्पात बदल करणे घातक आहे. त्यामुळे महारेलसोबत प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू ठेवून पूर्वी ठरल्याप्रमाणे मूळ मार्ग कायम ठेवा. त्याचबरोबर अहमदनगर-पुणे रेल्वे प्रकल्प सध्या दौंड मधून असल्याने अहमदनगर आणि पुणे दरम्यान प्रवास करण्यासाठी लागणाऱ्या नियमित वेळेपेक्षा दुप्पट वेळ असल्याने अहमदनगरच्या नागरिकांना या रेल्वे मार्गाचा कोणताही फायदा नाही. ट्रेनचा मार्ग बदलून प्रकल्पाला वळसा न घालता सरळ दिशेने नेण्याची नागरिकांची मागणी आहे. या रेल्वे प्रकल्पात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः लक्ष घालून हस्तक्षेप करण्याची मागणी आमदार सत्यजीत तांबेंनी केली.

 

 

महाराष्ट्रातील रेल्वे जाळ्यापैकी नाशिक हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. नाशिक रेल्वे स्थानकाच स्वच्छतेचा प्रश्न कायम असून रेल्वे स्थानक अद्ययावत करणे आवश्यक आहे. नाशिक रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्थानकावर नियमित स्वच्छता मोहीम राबवावी, त्याचबरोबर वंदे भारत गाडी नाशिकरोड स्थानकावर दोन वेळा थांबते. परंतु ट्रेनचा सरासरी वेग खूपच कमी असून स्वच्छतेच्या समस्याही प्रवाशांनी मांडल्या आहेत. या प्रकरणाकडे तातडीने लक्ष देऊन, वंदे भारत सारख्या प्रीमियम एक्सप्रेस ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी आ. तांबेंनी केली आहे.

 

याशिवाय कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून चाळीसगाव, पाचोरा रेल्वे स्थानकावर थांबणारी महाराष्ट्र एक्सप्रेस चाळीसगावला सकाळी ७:१२ वाजता पोहोचणारी गाडी सध्या स्थानकावर पहाटे ५:५८ वाजता पोहोचते. शिवाय, देवळाली भुसावळ मेमू ट्रेनची वेळ पूर्वी सकाळी ८:०० वाजता होती, परंतु आता ही ट्रेन ९:४५ वाजता येते. लवकर उठून निघावे लागत असल्याने लोकांना त्रास असल्याने महाराष्ट्र एक्स्प्रेस आणि देवळाली भुसावळ या दोन्ही मेमू गाड्यांच्या वेळा पूर्वीप्रमाणे पूर्ववत कराव्यात असे म्हंटले आहे.