महा आयटीच्या कामावरून आ. सत्यजीत तांबे सभागृहात आक्रमक 

महा आयटीच्या कामावरून आ. सत्यजीत तांबे सभागृहात आक्रमक

 

– उत्तरात गोंधळ, मागील अधिवेशनातील दिले दाखले

 

 

प्रतिनीधी, मुंबई

 

राज्याच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमांतून आमदार सत्यजीत तांबेंनी महाआयटी संदर्भात प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाला ८ वर्षे पुर्ण होऊन देखील कर्मचाऱ्यांचे वेतन व धोरण लागू झालेले नाही. यासंदर्भात माजी निवृत्त अधिकारी के.पी. बक्क्षी यांची समीती नेमली, परंतु अद्याप कर्मचाऱ्यांना वेतन लागू करण्यात आले नाही. ग्रामपंचायतींमध्ये वायफाय राउटर लावण्याचे काम देखील अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे आ. सत्यजीत तांबेंनी सभागृहात म्हंटले.

 

केंद्राच्या माध्यमातून सुरू झालेली भारत नेट योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत पातळीपर्यंत इंटरनेट सुविधा पुरविण्याचे काम माहिती तंत्रज्ञान मंडळ(महाआयटी) तर्फे सुरू आहे. गेली अनेक वर्षे याबाबतीत फायबर आॅप्टीकल केबल नेटवर्कचे काम चालूच आहे. २० डिसेंबर २०२३ रोजी ४९,४६४(८८ टक्के) किलोमीटर केबल नेटवर्कचे काम पुर्ण झाल्याचे सांगण्यात आलेले. मागील लक्षवेधी मांडून १९७ दिवस उलटले असून आॅप्टीकल केबल नेटवर्कचे काम ५०,४९९ किलोमीटर (९० टक्के) इतक्या दिवसात फक्त २ टक्केच काम झालेले आहे. हे काम इतके हळू का चालू आहे? त्यावर शासन काय काम करत आहेत? त्याचबरोबर ९,१४६ ग्रामपंचायतींमध्ये वायफाय राउटर लावण्याचे ७३ टक्के काम झाले, असे मागील अधिवेशनाच्या वेळी सांगण्यात आले होते. मात्र १९७ दिवस उलटुनही त्याचे काम फक्त ७९ टक्केच झाले. हा इतर ग्रामपंचायतींवर प्रचंड अन्याय असल्याचे आ. सत्यजीत तांबेंनी सभागृहात सांगितले.

 

क्लाऊड स्टेटस कंपनीने १७ आॅगस्ट २०२३ रोजी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान मंडळाची देयके सादर केली नसल्याने त्या कंपनीला पेंमट थांबवण्यात आले. त्यानंतर क्लाऊड स्टेटस कंपनीने ६-७ दिवस ईमेलची सेवा बंद केली होती. त्यामुळे नागरिक, विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. याबाबतची लक्षवेधी आ. सत्यजीत तांबे यांनी हिवाळी अधिवेशनात देखील मांडली होती. त्यावर ईमेल सेवा फक्त २ दिवस बंद होती असे उत्तरात सांगण्यात आले होते. परंतु आजच्या उत्तरात ही सेवा बंदच झाली नव्हती आणि कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. या दोन्ही उत्तरामध्ये तफावत दिसत आहे त्याची योग्य चौकशी करून कारवाई करणार का? नक्की सेवा बंद झालेली का? सेवा जर बंद झाली असेल तर त्या दोषींवर कारवाई करणार का? असे प्रश्न आ. सत्यजीत तांबेंनी सभागृहात उपस्थित केले.

 

आ. सत्यजीत तांबे यांच्या प्रश्नावर मंत्री तानाजी सावंत म्हणाले की, ग्रामीण भागात फायबर आॅप्टीकल केबल नेटवर्कचे काम करत असताना शेतकरी, गावकरी हे विरोध करून काम थांबवतात. तसेच राष्ट्रीय महामार्ग, वनखाते यांच्या परवानगीने काम पुढे जात असते त्यामुळे कामांना वेळ लागतो. १२,५१३ ग्रामपंचायतींपैकी ८० टक्के काम पुर्ण झालेलं आहे. उर्वरित काम काही अडचणींमुळे राहिले ते काम लवकरात लवकर पुर्ण करण्याचे आदेश आजच देण्यात येतील. त्याचबरोबर ज्या विभागाने आपल्या सेवा अपलोड केल्या नसतील त्यांची बैठक घेऊन त्यांना समन्स देण्यात येईल. वेतनासंदर्भात देखील बैठक घेण्याचे आश्वासन मंत्री तानाजी सावंत यांनी दिले.

 

चौकट

 

सरकारी कार्यालयांमध्ये व्यवस्थित यंत्रणा देखील नाही.

 

लाडकी बहीण योजनेला जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. परंतु सरकारी कार्यालयांमध्ये व्यवस्थित इंटरनेट उपलब्ध नसल्याने हजारोंच्या रांगा लागत आहेत. अनेक महिलांना तासंतास रांगेत उभं राहावं लागतयं. या गोष्टींचा फायदा घेत काही एजेंट १०००-१२०० रुपये घेऊन त्यांचे फॉर्म भरत आहेत. यात संपुर्ण दोष हा महाआयटीचा आहे. महाआयटी सरकारी कार्यालयांमध्ये व्यवस्थित यंत्रणा उभी करू शकली नाही. सरकारी कार्यालयां बाहेर हजारो लोकांची गैरसोय होत आहे त्यावर महाआयटीने त्वरित उपाययोजना कराव्यात.

 

सत्यजीत तांबे, आमदार