शाळांमध्ये कला, क्रीडा आणि कार्यानुभव शिकवण्याची व्यवस्था करा आमदार सत्यजीत तांबेंनी सभागृहात केली मागणी
– तज्ञ शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय
प्रतिनिधी, मुंबई
शिक्षण अधिकार कायद्यानुसार राज्यातील प्रत्येक बालकाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. परंतु महाराष्ट्रातील विद्यार्थी अजूनही कला, क्रीडा आणि कार्यानुभव अशा महत्त्वाच्या विषयांच्या शिकवणी पासून वंचित असल्यामुळे या विषयांसाठी अनुभवी शिक्षकांची त्वरित नियुक्ती करा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात केली.
शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून महाराष्ट्रातील शिक्षण विभागाने कला, क्रीडा आणि कार्यानुभव या विषयांच्या विषयांची पदे रिक्त ठेवली आहेत. इतर राज्यांमध्ये या विषयांसाठी अनुभवी शिक्षक आहेत, परंतु महाराष्ट्रातील मुलांना कला व क्रीडा विषय शिकवण्यासाठी विशेष तज्ञ शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. या विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्रातील शाळांमध्ये कला, क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करणे अत्यंत आवश्यक असल्याचे आमदार सत्यजीत तांबे म्हणाले.
याबाबत आमदार सत्यजीत तांबे यांनी शिक्षण मंत्र्यांना २६ मे २०२२ रोजी पत्र देखील लिहिले होते. त्यानंतर २१ जून २०२२ ला याबाबत बैठकीचे आयोजन देखील करण्यात आले होते. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे ही बैठक होऊ शकली नाही. विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही यासाठी ही बैठक पुन्हा आयोजित करून महाराष्ट्रातील शाळांमध्ये कला, क्रीडा आणि कार्यानुभव विषयांसाठी तज्ञ शिक्षकांची लवकरात लवकर नियुक्ती करावी, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली.