सोयाबीन उत्पादक शेतकरी पिक विमा योजनेपासून वंचित-अमोल शिंदे
——————————————————–
जिल्हाधिकारी व कृषी अधीक्षक यांना निवेदन देऊन सोयाबीनचा पिक विम्यात समावेश करण्याची केली मागणी
——————————————————–
पाचोरा-
येथील भारतीय जनता पार्टी पाचोरा- भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी काल दि.२ जुलै मंगळवार रोजी मा.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तडवी यांची भेट घेऊन पाचोरा व भडगाव तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पिक विमा काढताना येत असलेल्या समस्या मांडल्या.
पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील सोयाबीन लागवड केलेले शेतकऱ्यांना १ रुपया मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेत लाभ घेता येत नसल्याने पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी शिंदे यांच्याशी सदर समस्या मांडून पिक विमा योजनेत सहभाग घेता यावा अशी मागणी केली होती. या संदर्भात सविस्तर माहिती घेतली असता सेतू सुविधा केंद्रावर पीक विमा काढताना संबंधित पोर्टलवर पाचोरा व भडगाव तालुक्यामध्ये सोयाबीन पिकाचा पर्याय उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होताना दिसत आहे. मागील वर्षापेक्षा सोयाबीन पिकाचा पेरा यावर्षी वाढला असून मागील वर्षी देखील हाच मुद्दा आम्ही प्रशासनाकडे मांडला होता परंतु आज पावतो या संदर्भात प्रशासनाने व सदर विमा कंपनीने यात कुठलीही उपाययोजना केली नसून मागील वर्षा प्रमाणे यावर्षी देखील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पिक विमा काढण्यास अडचणींना सामोरे जावे लागत आहे.तसेच सदर विषयात मंत्री गिरीश महाजन व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन लवकरच शेतकऱ्याची ही अडचण दूर करू असे अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे भडगाव तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील,जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप पाटील,पंचायत समितीचे माजी सभापती व सरचिटणीस बन्सीलाल पाटील युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रदीप सोमवंशी,विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील,किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष विजय महाजन व आदी पदाधिकारी उपस्थित होते.