घटस्फोट झालेल्या बायकोला आणि तीच्या नव्या नवऱ्याला पहिल्या नवऱ्या कडून बंदुकीच्या गोळीने जीवे मारण्याचा प्रयत्न

घटस्फोट झालेल्या बायकोला आणि तीच्या नव्या नवऱ्याला पहिल्या नवऱ्या कडून बंदुकीच्या गोळीने जीवे मारण्याचा प्रयत्न,सासरा मध्ये येताच त्यांच्या बरगडीत शिरली गोळी, पोलिसांनी तत्परतेने आरोपीच्या मुसक्या आवळल्या!

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”/स्पेशल क्राईम रिपोर्टर/अहमदनगर जिल्हा) पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणाऱ्या घटना संपूर्ण राज्यभर सतत घडत आहेत. गुन्हेगारी प्रव्रुत्तीच्या लोकांना कायद्याचे भयच राहिले नसल्याचे अनेक घटनेतून दिसून येत आहे. महाराष्ट्राचा बिहार होतोकी काय?अशी भीतीदायक परीस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसु लागली आहेत.कायद्याचे राज्य आहे की फायद्याचे हेच समजेनासे झाले आहे. याबाबत ची घटना अशी की अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील येळी येथील सुभाष विष्णु बडे (वयवर्षे३०) याचे एका मुलीशी सातवर्षा पुर्वी लग्न झाले होते. परंतु लग्नानंतर वैवाहिक जिवनात त्यांचे सारखे खटके उडून आपसात तूं तू मी मी होउन पटेनाशे झाले होते.सततच्या भांडणाला वैतागून सुभाषच्या बायकोने न्यायालयात जाउन रितसर घटस्फोट मिळविला होता.आणि ती दुसरा विवाह करून मोकळी झाली होती.तेथे ही तीचे मन रमले नाही. मग तिने हा पंधरा दिवसापूर्वी तिसरा विवाह केला होता ही गोष्ट सुभाष बडे यांच्या फारच जिव्हारी लागली होती. कायदेशीर घटस्फोट मिळाल्याने आणि नवीन विवाह झाल्यामुळे सुभाषची बायको बिनधास्त नवीन सासरच्या घरी आनंदाने रहात होती.आणि सुभाष मात्र येळी येथे बायकोच्या नावाने शिव्यांची लाखोली वहात होता. बायकोने आपल्याला कायदेशीर घटस्फोट देऊन वाऱ्यावर सोडून दिले आणि स्वतः मात्र नवीन नवऱ्याच्या घरात खुशीत रहात आहे हीच गोष्ट सुभाष बडे याला सारखी सतावत होती. घटस्फोट झाला तरीही सुभाष हा तिला अजूनही आपली बायकोच समजत होता. बुधवार दि.२६ जून २०२४ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास सुभाष विष्णु बडे हा त्याच्या घटस्फोटीत बायकोचे पंधरा दिवसापूर्वी नवीन लग्न झालेल्या घरी हत्राळ ,तालुका पाथर्डी,जिल्हा अहमदनगर गावी हातात पिस्तूल घेऊन आला होता. सुभाषला घटस्फोट देऊन नवीन लग्न झालेल्या बायकोच्या घरातील माणसे जेवण करीत होते.सुभाष घरात येताच नवविवाहितेला आणि तीच्या नवीन नवऱ्याला शिविगाळ करीत होता. दोघात चांगलीच झटापट झाली होती. नवविवाहितेला आणि तीच्या नवऱ्याला जीवे मारण्याचा सुभाष याचा डाव होता. परंतु पिस्तूलातून सुटलेल्या गोळ्या अचानक मध्ये आलेल्या नवविवाहितेच्या सासऱ्यालाच लागल्याने सुभाषचा डाव फसला. प्रचंड आरडाओरडा होताच शेजारीच राहणाऱ्या लोकांनी सुभाषची चांगली धुलाई करून त्याला तेथेच दाव्याने बांधून ठेवले आणि तात्काळ पोलिसांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिले.पोलिसांनी संशयित आरोपी सुभाष बडे याच्या मुसक्या आवळल्या आहेत. आणि त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.पिस्तूलाची गोळी लागून जखमी झालेल्या माणिक सुखदेव केदार वय (५५) रा.हत्राळ यांना पाथर्डी येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.परंतु शरीराच्या बरगडीत असलेली गोळी शस्त्रक्रिया करून काढावी लागणार असल्याने त्यांना अहमदनगर येथील अशासकीय दवाखान्यात हलविण्यात आले आहे.या बाबद गोळी लागून जखमी झालेल्या माणिक सुखदेव केदार यांचा मुलगा किरण माणिक केदार यांनी पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा रजिस्टर नंबर ६५५/२०२४ कलम ३०७,३२३,५५२,सह आर्म अँक्ट ३,४,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी(डी वाय एस पी) सुनिल पाटील यांच्या आदेशानुसार आणि पाथर्डी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन लिमकर पो.काँ.सुहास गायकवाड,संदिप बडे, अमोल आव्हाड हे पुढील तपास करीत आहेत.घटस्फोट झालेल्या बायकोला आणि तीच्या नव्या नवऱ्याला बंदुकीच्या गोळीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पाथर्डी तालुक्यातील अनेक गावात गावठी कट्टे नेमके कोठून येतात याचा पोलिसांनी शोध घेणे अत्यंत गरजेचे आहे. मागील दोन महिन्यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे प्रांतिक सरचिटणीस प्रतापराव ढाकणे यांनी पाथर्डी पोलीस स्टेशनवर सर्व पक्षाच्या वतीने जाहीर मोर्चा काढला होता तेव्हा जगजाहीर पणे मिडिया समोर पोलिसांना गावठी कट्टे शोधून काढण्याचे ढाकणे यांनी आवाहन केले होते.परंतु किती गावठी कट्टे हाताला लागले ही माहिती मात्र अजून गुलदस्त्यातच आहे. पोलिसांनी समयसूचकता ओळखून आरोपीला पळून जाउन फरार होण्या आधीच मोठ्या कार्य तत्परतेने संशयित आरोपीना ताब्यात घेऊन गजाआड केले म्हणून पाथर्डी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.