‘नमामि गोदावरी’ प्रकल्पाला गती द्या – आ. सत्यजीत तांबे 

‘नमामि गोदावरी’ प्रकल्पाला गती द्या – आ. सत्यजीत तांबे

– दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची घेतली भेट

– गोदावरी व उप नद्यांचे प्रदूषण थांबवण्यासाठी निधीची केली मागणी

 

प्रतिनिधी

 

नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे महाराष्ट्रातील प्रश्नांबाबत केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीसाठी सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रातील गोदावरी व उपनद्यांच्या प्रश्नांसंदर्भात केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. नाशिक येथे २०२६ साली महाकुंभ मेळा होणारा आहे. या महाकुंभ मेळ्याला कोट्यवधी भाविक, साधू, संत, महंत नाशिकला भेट देणार असून नमामि गोदावरी प्रकल्प जलद गतीने राबवण्यात यावा यासाठी आ. सत्यजीत तांबे यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची दिल्ली येथे भेट घेत निवेदन दिले.

 

महाराष्ट्रातील अहमदनगरमधील संगमनेर येथील प्रवरा, म्हाळुंगी आणि आधाळा या गोदावरीच्या उपनद्या आहेत. या नद्यांचा ‘अमृतवाहिनी नदी पुनरुज्जीवन आणि विकास प्रकल्प’ अंतर्गत विकास आणि पुनरुज्जीवन करावे. या नद्यांच्या संवर्धन, सुशोभीकरण आणि पुनरुज्जीवनासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती आमदार सत्यजीत तांबेंनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे केली आहे.

 

महाकुंभ मेळ्यास एक – दीड वर्षांचा अवधी शिल्लक असल्याने नमामि गोदावरी प्रकल्पाला गती देण्यात यावी. तसेच उत्तर महाराष्ट्रातील गोदावरी नदीच्या उपनद्यांचे प्रदूषण थांबवण्यासाठी व नदी पात्र सुशोभिकरणासाठी भरीव निधी देण्याची मागणी आमदार सत्यजीत तांबे केली. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील हे उत्तर महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहेत. त्यामुळे ते या प्रकल्पाचा विचार करतील आणि जलशक्ती मंत्रालयाच्या योजनांतर्गत आर्थिक मदत करून या भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी ते प्राधान्य देतील असा विश्वास आ. तांबे यांनी व्यक्त केला.