शेतकऱ्यांची मुले वैद्यकीय क्षेत्रात आली हे अभिमानास्पद – आ. सत्यजीत तांबे

शेतकऱ्यांची मुले वैद्यकीय क्षेत्रात आली हे अभिमानास्पद – आ. सत्यजीत तांबे.
– ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेत अकोल्याच्या विकासकामांवर चर्चा
– आगामी काळात गावातील शैक्षणिक समस्या सोडविण्याचे आश्वासन

प्रतिनिधी,

अहमदनगर – नाशिक पदवीधर मतदारसंघांचे आमदार सत्यजीत तांबे हे आमदार झाल्यापासून अनेक तालुके व जिल्ह्यात सातत्याने दौरे करत आहेत. त्यांनी नुकताच अकोले तालुक्याचा दौरा केला. दौऱ्यादरम्यान, आ. तांबेंनी विविध गावातील अनेक नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा केली.

आ. सत्यजीत तांबे हे अकोले तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी साईसुमन हॉस्पिटल व वेदांत मेडिकल स्टोअर्सचे उद्घाटन केले. यावेळी सत्यजीत तांबे यांनी उद्योग-व्यवसाय संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. तसेच तरुण वर्गाने मोठ्या प्रमाणावर उद्योग-व्यवसायाकडे वळले पाहिजे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.

त्याचबरोबर धामणगाव येथील भारतरत्न राजीव गांधी विद्यालयाला भेट देत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. तसेच अहमदनगर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष बबनराव वाळुंज यांच्या कार्यालयास देखील भेट दिली. ढोकरी गावात ग्रामस्थांनी विविध विषयांवर चर्चा करत काही समस्यांविषयी ग्रामस्थांनी निवेदन दिले. तर आगामी काळात या सर्व समस्या मी नक्की सोडवेल, असा विश्वासही आ. तांबेंनी ग्रामस्थांना दिला. यावेळी ढोकरी गावातील ग्रामस्थ व युवक वर्ग उपस्थित होता.

इंदोरी गावातील प्रगतशील शेतकरी शिवाजी हासे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. तसेच गावातील ग्रामस्थांसोबत विकासकामांविषयी चर्चा केली. अकोले तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि सहकाऱ्यांच्या निवासस्थानी भेटी देत त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, असे आ. सत्यजीत तांबेंनी सांगितले.

चौकट

जिल्हा व तालुक्यांचा दौरा अजूनही निरंतर सुरूच

आमदार झाल्यापासून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकाच वर्षात पाच जिल्ह्यांचा आभार दौरा १५९ दिवसांत पूर्ण केला. यात ५४ तालुक्यांचा आभार दौरा करताना किमान ५० हजाराहून अधिक किलोमीटरचा प्रवास केला. आता मतदारसंघात १५ महिन्यात १ लाख २० हजार किलोमीटरहून अधिक प्रवास केला आहे. तरी मतदारसंघाचा दौरा अजूनही निरंतर सुरूच आहे.
– सत्यजीत तांबे, आमदार.
………………………………………………………………..