चोपडा महाविद्यालयातील पिकलबॉल स्पर्धा विजेत्या विद्यार्थ्यांना नॅट फाउंडेशन, मुंबईतर्फे शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान

चोपडा महाविद्यालयातील पिकलबॉल स्पर्धा विजेत्या विद्यार्थ्यांना नॅट फाउंडेशन, मुंबईतर्फे शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान

 

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयात नॅट फाउंडेशन, मुंबई व सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमी, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने पिकलबॉल स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए. सूर्यवंशी हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. तसेच नॅट फाउंडेशनचे मॅनेजिंग ट्रस्टी चेतन सनील, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए. एल. चौधरी, उपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे, समन्वयक डॉ. एस. ए.वाघ, उपप्राचार्य ए. एन.बोरसे, रजिस्ट्रार डी.एम.पाटील व सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक भूपेंद्र पोळ आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी नॅट फाउंडेशन, मुंबई यांच्यातर्फे वर्षा चौधरी, सनी पाटील, अभिषेक वाघ, भूषण बाविस्कर उज्वला गद्रे या यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारून क्रीडाविषयक कामगिरीसाठी शिष्यवृत्ती आली. यावेळी स्नेहल पाटील, भूपेंद्र पोळ, रोहित पाटील, अंजली पोळ, जीनिशा क्षीरसागर या स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पिकल बॉल स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना तसेच प्राध्यापकांना टी-शर्ट देऊन नॅट फाउंडेशन, मुंबई व सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमी, चोपडा यांच्यातर्फे गौरविण्यात आले. याप्रसंगी अभिषेक वाघ, नर्मदानंद चौधरी, एलिना साळवी, कलश क्षीरसागर या विद्यार्थ्यांचा पिकलबॉल किट देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी नॅट फाउंडेशन मुंबईचे मॅनेजिंग ट्रस्टी चेतन सनील मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, पिकल बॉल या खेळाला उज्वल भविष्य आहे. खेळाडूंनी हा खेळ नेहमी खेळावा व त्याचा सराव करावा. चोपड्यातील पिकलबॉल खेळाडू चमकदार कामगिरी करत आहे, ही अतिशय गौरवाची बाब आहे.चोपड्यासारख्या ग्रामीण भागात पिकलबॉल खेळासाठी पोषक वातावरण असल्याने त्याचा खेळाडूंनी फायदा घ्यायला हवा. आमच्या संस्थेतर्फे विविध सामाजिक कार्यासाठी आर्थिक मदत देऊन प्रोत्साहित केले जाते तसेच चोपड्या सारख्या ग्रामीण भागातील खेळाडूसाठी देखील आर्थिक योगदान देण्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए. सुर्यवंशी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक भूपेंद्र पोळ यांनी चोपड्यासारख्या भागात पिकलबॉल हा खेळ प्रथमतः आणला व त्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले. पिकल बॉल या खेळाचा विद्यापीठ खेळांमध्ये तसेच ऑलिंपिक खेळांमध्ये समावेश व्हावा असेही ते म्हणाले. या खेळातून शारीरिक व मानसिक स्वास्थ्य टिकवता येते ही महत्त्वाची गोष्ट खेळाडूंनी लक्षात घ्यायला हवी. यावेळी खेळातील यशस्वी खेळाडू यांना नॅट फाउंडेशन मुंबई व सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमी चोपडा यांच्यातर्फे प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.एल.बी.पटले यांनी केले तर आभार डॉ. बी.एम. सपकाळ यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, यशस्वी खेळाडू, विद्यार्थी उपस्थित होते.