उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत निलेश लंके यांचा आमदारकीचा राजीनामा राज्यपालाकडे सुपुर्त ?
(सुनिल नजन”चिफ ब्युरो”/ अहमदनगर जिल्हा स्पेशल क्राईम रिपोर्टर) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशाला अखेर केराची टोपली दाखवत पारनेरचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा राज्यपालाकडे ईमेलने पाठवून दिला आहे.यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गटाला जोरदार झटका बसला आहे.ना. अजितपवार यांनी लंके यांना पक्ष न सोडण्याचे आदेश दिले होते.आणि पक्ष सोडायचा असेल तर अगोदर राजीनामा द्यायला सांगितले होते. मग निलेश लंके यांनी आमदारकीवर पाणी सोडले. पक्षांतर बंदीची कारवाई होउ नये म्हणून निलेश लंके यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्त्याच्या जाहीर सभेत सहभागी होउन रडत रडत हा राजीनामा दिला आणि आपण लोकसभा निवडनुक लढवित असल्याचे सुतोवाच केले .लोकसभा निवडनुकीसाठी शरदचंद्र पवार गटाची तुतारी वाजवत लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय जाहीर केला. माजी आमदार निलेश लंके यांची अवस्था महाभारतातील चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यू सारखी झाली आहे.दुसऱ्यांच्या झेंड्यावर पंढरपूर करणाऱ्यांची आमची औलाद नाही असे विखे पिता पुत्रावर टीकास्त्र सोडत लंके यांनी आतापासूनच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणांगण गाजवायला सुरुवात केली आहे. शरदचंद्र पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देव माणसं आहेत त्यांनी भरभरून प्रेम दिले. मी त्यांचे ऋण विसरणार नाही असे ही सांगण्यास लंके विसरले नाहीत. आपण दोन लाख मतांनी विजयी होऊ अशी वल्गनाही त्यांनी केली आहे.लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील हे विजयासाठी नेमके कोणते डावपेच खेळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लंकेना उभे करून शरदचंद्र पवार यांनी पुन्हा एकदा विखेपाटील यांना डिवचले असुन पुन्हा १९९१ च्या निवडणूकीतील अपक्ष पद्मश्री स्व.बाळासाहेब विखे पाटील विरोधात काँग्रेसचे यशवंतराव गडाख या निवडणुकीची आठवण करून दिली आहे.खरी निवडणूक लंके विरूद्ध विखे अशी नसुन शरदचंद्र पवार विरुद्ध विखे पाटील अशाच पद्धतीने ही निवडणूक गाजण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे “तेल ही गेले अन् तुपही गेले आणि हाती धुपाटणे आले “अशी लंकेची अवस्था होईल की काय अशी शक्यता नाकारता येत नाही. कारण लंकेना टक्कर देण्यासाठी विखेपाटील यंत्रणेच्या माध्यमातून बारीक सारीक तपशीलवार गोष्टींवर लक्ष केंद्रित करून आपलं ध्येय सहज साध्य करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. अहमदनगर जिल्हा लोकसभा मतदारसंघात फक्त एकदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार स्व.तुकाराम गडाख हे निवडून गेले होते.नंतर मात्र भाजपाचे स्व.दिलिप गांधी यांनी या मतदारसंघात आपली पकड निर्माण करीत विजय मिळवला होता.आताही हा मतदारसंघ भाजपाचे खासदार सुजयदादा विखेपाटील यांच्याच ताब्यात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत नेमकं कोण विजयी होणार हे आगामी काळच ठरवणार आहे. विखे पाटील विरुद्ध लंके पाटील या निवडणुकीपूर्वीच गाजलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.विखेंच्या प्रतिष्ठेची आणि लंकेच्या अस्तित्वाची ही निवडणूक लढाई सुरू झाली आहे. बारा एप्रिल पासून प्रत्यक्ष नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून छाननी वीस एप्रिलला होत आहे त्या नंतरच निवडणूकीचे खरं चित्र स्पष्ट होणार आहे.लंकेच्या आरोपांना विखेपाटील नेमकी कोणती तोफ डागून काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.