लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी लागणाऱ्या परवानगी आणि त्याला लागणाऱ्या कागदपत्राची यादी जाहीर
जळगाव दि.26 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता मतदार संघातील प्रचारासाठी विविध परवानगी देण्याकरिता सुविधा कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. मात्र उमेदवारांना परवानगी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यांच्याबाबत संभ्रम निर्माण होत असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी परवानगी साठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी प्रसिद्ध केली आहे.
*जाहीर सभा चौक सभा व सर्व प्रकारच्या सभा*
उमेदवारांना घ्यावयाच्या जाहीर सभा, चौकसभा, तसेच सर्व प्रकारच्या सभांसाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांची परवानगी आवश्यक आहे. त्यासाठी उमेदवाराचा परवानगी साठीचा अर्ज, सभेसाठी जागेची परवानगी देताना जागा स्थानिक प्राधिकरणाच्या ताब्यात असल्यास त्यांचेकडील ना हरकत दाखला,भाडे पावती, शिक्षण संस्था किंवा अन्य खाजगी संस्था यांच्या मालकीची जागा/ मैदान असल्यास संबंधित संस्थेचे संमती पत्र उपविभागीय अधिकारी यांचा ना हरकत दाखला, स्वतंत्र प्रवेश व बाहेर जाण्याचा मार्ग असणे आवश्यक, सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस विभागाने छाननी करून अशा प्रस्तावास मान्यता द्यावी, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सदर सभेसाठी प्रपत्र संबंधितांकडून घ्यावे, तसेच सक्षम अधिकारी यांना आवश्यक वाटतील अशी कागदपत्रे सोबत जोडणे आवश्यक आहे.
*पोस्टर्स झेंडे,कापडी बॅनर*
सार्वजनिक ठिकाणी पोस्टर झेंडे कापडी बॅनर लावण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी आवश्यक आहे. परवानगीसाठी उमेदवाराचा अर्ज, खाजगी जागा असल्यास मालकाचे संमती पत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा असल्यास ही परवाना फी जाहिरात फी ची पावतीआवश्यक आहे.
*खाजगी जागेवर जाहिरात फलक प्रचार साहित्य लावणे*
खाजगी जागेवर उमेदवाराला जाहिरात फलक प्रचार साहित्य लावण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घ्यायची असल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज खाजगी जागा असल्यास जागा मालकाचे संमती पत्र,स्थानिक स्वराज्य संस्था जागा परवाना फी,व पोलिसांचा ना हरकत दाखला आवश्यक आहे.
* प्रचार वाहन परवानगी*
प्रचार वाहनाची परवानगी घ्यावयाची असल्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक असते त्यासाठी उमेदवाराचा अर्ज, वाहनाचे आरसी बुक, वाहनाचा विमा, कर भरल्याची पावती, पियूसी प्रमाणपत्र, वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा ना हरकत दाखला, वाहनाचा चारही बाजूंचा फोटो, पोलिसांचा ना हरकत दाखला, व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, चालकाचा वाहन चालवणे बाबतचा परवाना आवश्यक आहे.
*उमेदवाराचे तात्पुरते प्रचार कार्यालय*
उमेदवाराला तात्पुरते प्रचार कार्यालय उघडायचे असल्यास संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची परवानगी गरजेची असते. त्यासाठी संबंधित उमेदवाराचा अर्ज, खाजगी जागा असल्यास मागलकाचे संमती पत्र, स्थानिक स्वराज्य संस्था जागा परवाना फी, व पोलिसांचा ना हरकत दाखला आवश्यक आहे.
हेलिपॅड व हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी
संबंधित उमेदवाराला हेलिपॅड व हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगी घ्यायची असल्यास अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांची परवानगी आवश्यक असते त्यासाठी संबंधित उमेदवाराचा त्याबाबतचा अर्ज, पोलीस अधीक्षक यांचे ना हरकत प्रमाणपत्र, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांचे ना हरकत प्रमाणपत्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र, अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र, रुग्णवाहिकेच्या उपलब्धतेबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
ध्वनीक्षेपकाची परवानगी
प्रचार सभा किंवा प्रचार फेरीसाठी ध्वनिक्षेपक लावायचे असल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची परवानगी लागते.त्याबाबतच्या परवानगीसाठी संबंधित उमेदवाराचा अर्ज, वाहनांसाठी आरटीओ व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे परवानगी व पोलीस ठाण्याचे प्रभावी अधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे.
शाळेच्या मैदानावरील सभा
संबंधित उमेदवाराला शाळेच्या मैदानावर प्रचार सभा आयोजित करावयाची असल्यास त्यासाठी लागणाऱ्या परवानगीसाठी उमेदवाराने उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे स्वतःचा अर्ज, व त्यासोबत शाळा व्यवस्थापन समितीचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
सोशल मीडिया,इलेक्ट्रॉनिक मीडिया,प्रिंट मीडियावर प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती
उमेदवाराला सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, किंवा प्रिंट मीडियावर ( शेवटचे 48 तास ) जाहिरात प्रसिद्ध करायची असल्यास त्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी यांची परवानगी गरजेची आहे. परवानगीसाठी संबंधित उमेदवाराने प्रसिद्ध करावयाची जाहिरात एम.सी.एम.सी कमिटी कडून प्रमाणीत करून घेणे आवश्यक आहे.त्यासाठीचा फॉर्म मीडिया सेंटर येथे उपलब्ध होईल.
फ्लेक्स,बोर्ड,झेंडे,होर्डिंग्स,बॅनर व पोस्टर
संबंधित उमेदवाराला फ्लेक्स, बोर्ड, झेंडे, होर्डिंग, बॅनर किंवा पोस्टर लावायचे असल्यास संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी इमारतीवर झेंडे,पोस्टर,बॅनर लावण्यासाठी संबंधित जागा मालकाचे संमती पत्र, ठरलेल्या भाड्याचा रकमेचा तपशील, तसेच सक्षम प्राधिकारी यांना आवश्यक वाटते अशी अन्य कागदपत्रे व वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा पद्धतीने पोस्टर प्रदर्शित करण्याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
मिरवणूक,पदयात्रा,रॅली,प्रचार फेरी, रोडशो
उमेदवाराला मिरवणूक पदयात्रा रॅली प्रचार फेरी किंवा रोड शो करावयाचा असल्यास त्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची किंवा प्रभावी अधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे परवानगीसाठी उमेदवाराचा अर्ज पदयात्रा व रॅलीच्या मार्गाचा आराखडा वाहनांसाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचे ना हरकत प्रमाणपत्र पदयात्रेसाठी रॅलीच्या मार्गाच्या आराखड्यास वाहतूक पोलिसांची परवानगी तसेच सक्षम प्राधिकारी यांना आवश्यक वाटतील अशी सर्व कागदपत्रे आवश्यक राहतील.