राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कौशल्याधिष्ठित व रोजगाराभिमुख शिक्षणावर भर दिला जाईल-अधिष्ठाता डॉ.ए.पी.डोंगरे
चोपडा:येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तसेच महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालय, चोपडा अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण: २०२० संकल्पना व पूर्वतयारी’ या विषयावर आधारित एकदिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या सेमिनारच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सेमिनारचे उदघाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ.सौ. स्मिताताई संदीप पाटील या उपस्थित होत्या.यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.ए.पी.डोंगरे, बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आंतरविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ.एस.टी.भूकन, रसायनशास्त्र अभ्यास मंडळाचे प्रमुख व उपप्राचार्य डॉ.गुणवंत सोनवणे, प्राचार्य डॉ. ए.पी.सौंदाणकार, प्राचार्य डॉ.संजय चौधरी, प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील, चोपडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. एन.एस.कोल्हे, समन्वयक डॉ.एस.ए.वाघ तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व सेमिनारचे समन्वयक प्रा. डी.एस.पाटील आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या सेमिनारमध्ये पाच तालुक्यामधून १४ महाविद्यालयातील एकूण २२० हून अधिक प्राध्यापक प्रतिनिधी सहभागी झाले होते.
या सेमिनारचे प्रास्ताविक सेमिनारचे समन्वयक प्रा.डी.एस.पाटील यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ.सी.आर.देवरे यांनी करून दिला.
याप्रसंगी प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण:२०२० च्या बाबतीत जनजागृती व्हावी त्याचबरोबर त्याची रचना व माहिती विद्यार्थी व प्राध्यापकांना होणे गरजेचे आहे’.
‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण:२०२० स्पिरीट, थीम अँड प्रोस्पेक्ट्स’ या विषयावर मार्गदर्शन करताना वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ.ए.पी.डोंगरे म्हणाले की, ‘येणाऱ्या काळात शिक्षकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल.विद्यार्थ्यांना माहिती नसलेले व आवश्यक असलेले त्याचप्रमाणे समाजोपयोगी, कौशल्याधिष्ठित व रोजगाराभिमुख शिक्षण दिले गेले पाहिजे. नवनिर्मिती क्षमता विकसित करणे, क्रियाशील नवनिर्माणक्षण समाज घडविणे व सदसदविवेकबुद्धी युक्त व सुसंस्कारक्षम सकारात्मक दृष्टिकोन असलेला विद्यार्थी घडवून सुसंस्कारक्षम व समाजोपयोगी ज्ञान विद्यार्थ्यांना देणे हा नवीन शैक्षणिक धोरणामागील उद्देश असून विद्यार्थ्यांप्रती शिक्षकांचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे’.
याप्रसंगी प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण स्वीकारण्याची सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मानसिक तयारी ठेवायला हवी. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सक्षम व रोजगाराभिमुख शिक्षण देता येईल’.
याप्रसंगी आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.एस.टी.भूकन मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांपर्यंत मूळ ज्ञान पोचणे गरजेचे असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी येत्या काळात प्राध्यापक बंधू-भगिनींनी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे’.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.एल. बी. पटले यांनी केले तर आभार डॉ.के.डी. गायकवाड यांनी मानले. या सेमिनारच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील आयोजन समिती प्रमुख, सदस्य तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य प्राध्यापक बंधू-भगिनी, विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.