उस उत्पादक शेतकरी व कारखाना कामगारांचे पेमेंट वेळेवर होण्यासाठी कारखाना प्रशासनाच्या विरोधात साखर आयुक्तांना साकडे
सुनिल नजन “चिफ ब्युरो”अहमदनगर जिल्हा ) संपूर्ण महाराष्ट्रात साखर सम्राटांचे माहेरघर म्हणून ओळखला जाणारा जिल्हा म्हणजे अहमदनगर जिल्हा हा प्रसिद्ध आहे.परंतु साखर निर्मितीत अग्रेसर असलेल्या जिल्ह्यातील उस उत्पादक शेतकरी आणि कारखान्याचे साखर कामगार यांचे पेमेंट वेळेवर होत नसल्याने अतिशय हाल होत आहेत.म्हणून साखर कारखाना प्रशासनाच्या विरोधात कडक कारवाई करण्यासाठी थेट पुण्यातील साखर आयुक्तांना साकडे घालून कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी अंकुश काळे, रितेश भंडारी, अशोक टेमक, संतोष पोटे, भाऊसाहेब पवार यांच्या समवेत साखर आयुक्तांना निवेदन देऊन संबंधित साखर कारखाने हे शेतकरी आणि साखर कामगार यांची कशाप्रकारे पिळवणूक करीत आहेत या संदर्भात निवेदन देऊन कारखान्यावर कारवाई करण्यासाठीची तक्रार केली आहे.निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की शेतकऱ्यांचा उस गाळपासाठी नेल्यानंतर चौदा दिवसात संबंधित शेतकऱ्यांना पेमेंट देणे हे बंधनकारक असतानाही तिनं महिनेही उसाचे पेमेंट वेळेवर दिले जात नाही.कारखाना कामगारांनाही गेल्या आठ नऊ महिन्यांपासून वेळेवर पगार दिले जात नसल्याने अनेक कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे तर काही कामगार हे काम सोडून गेले आहेत.अपुऱ्या पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असतानाही ऊसतोड मिळवण्यासाठी ऊसतोडणी मजुरांना एकरी पाच हजार रुपये दक्षिणा दिल्याशिवाय उसतोड मजूर उसाला हात लावत नाहीत.अशा वेगवेगळ्या अडचणीत शेतकरी असताना जिल्ह्यातील जिल्ह्यातील साखर कारखाने उस उत्पादक शेतकऱ्यांची लूट करीत आहेत.त्यामध्ये मुळा आणि ज्ञानेश्वर यांचा नंबर अग्रेसर असल्याचे भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी साखर आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. निवेदनात असे नमूद केले आहे की साखर कारखान्याच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी सुधारणा करावी, उस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्याचे कामगार यांचे पेमेंट वेळेवर करावे. साखर कारखान्याचे मागिल तिनं वर्षांचे स्पेशल आॅडीट करावे अशा मागण्या निवेदनात नमूद करण्यात आलेल्या आहेत.साखर आयुक्त अनिल कवडे हे कारखान्याच्या प्रशासनाच्या विरोधात नेमकी काय कारवाई करतात याकडे सर्व उस उत्पादक शेतकरी आणि साखर कामगार यांचे लक्ष लागले आहे.जिल्ह्यातील काही निवडक साखर कारखान्यांनी मात्र शेतकरी आणि साखर कामगार यांचे हीत जोपासुन कारखाने सुरळीत चालवले आहेत. सहकार क्षेत्रात सर्वत्र शेतकरी आणि साखर कामगार यांचेच जास्त प्रमाणात हाल होताना दिसत आहेत.