चोपडा: येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव विद्यार्थी विकास विभाग व महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१७ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘पर्यावरण संरक्षण व संवर्धन जनजागृती अभियान’ अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते माजी शिक्षणमंत्री कै.अक्कासो.शरचंद्रिका सुरेश पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले.
या कार्यशाळेचे उदघाटन सातपुडयातील जैवविविधतेचे अभ्यासक वनरक्षक विजय शिरसाठ व वनरक्षक चुन्नीलाल कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वक्ते म्हणून डॉ. पी. एन. सौदागर तसेच विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. डी. डी. कर्दपवार, सहा. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. आर. आर. पाटील, हिंदी विभाग प्रमुख डॉ. ए. बी. सूर्यवंशी, प्रा.जी. बी. बडगुजर, प्रा. एस. जी. पाटील प्रा. डी. पी. सोनवणे व इतर मान्यवर उपस्थित होते.
या उदघाटन समारंभाचे प्रास्ताविक डॉ. डी. डी. कर्दपवार यांनी केले. प्रास्ताविक करतांना कार्यशाळेच्या आयोजनाविषयी माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, आज जागतिक तापमान वाढ मोठ्या प्रमाणात होत असल्याने पर्यावरण संरक्षण करणे काळाची गरज आहे. म्हणून पर्यावरण संरक्षण व संवर्धन जनजागृतीच्या अनुषंगाने प्रस्तुत कार्यशाळा महत्त्वपूर्ण असल्याचे स्पष्ट केले.
पहिल्या सत्रात प्रमुख वक्ते विजय शिरसाठ यांनी सातपुडयातील ‘जैव विविधता व पर्यावरण संरक्षण’ या विषयावर बोलतांना पीपीटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सातपुड्यात आढळणाऱ्या विविध पशू-पक्षींविषयी माहिती दिली तसेच पर्यावरणाचे महत्व, पर्यावरण संरक्षण व संवर्धनामध्ये नागरिकांची भूमिका या विषयी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच वनरक्षक चुन्नीलाल कोळी यांनी निसर्गातील सरपटणाऱ्या प्राण्यांविषयी अतिशय उपयुक्त माहिती देतांना सापांचे विविध प्रकार व विषारी सापांची माहिती दिली. पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी जनजागृती आपापल्या गावांमध्ये करण्यासाठी आव्हान केले.
दुसऱ्या सत्रात डॉ. पी. एन. सौदागर यांनी ‘पर्यावरण संरक्षण व संवर्धन काळाची गरज’ या विषयावर बोलतांना विविध औषधी वनस्पतींची माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच विद्यार्थ्यांना आवाहन केले की, आपण नियमित वापरत असलेल्या विविध फळ झाडांच्या बिया गोळा करून माती, शेण व नारळाच्या भूशामध्ये एकत्रित करून सिड बॉल करून प्रवास करतांना त्या बिया जंगलात फेकाव्या. जेणेकरून निसर्ग संरक्षण करता येईल.
या कार्यशाळेचे सूत्रसंचलन डॉ. आर. आर. पाटील यांनी केले तर आभार प्रा. एस. जी. पाटील यांनी मानले. या कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी विद्यार्थी विकास विभागातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
या कार्यशाळेप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.