आमदार सत्यजीत तांबे जळगावकरांच्या भेटीला
– मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या घेणार जाणून
– ११ ते १४ फेब्रुवारी असा चार दिवशीय जळगाव दौरा
प्रतिनिधी, जळगाव
आमदार झाल्यापासून सत्यजीत तांबे मतदारसंघात सतत दौरा करत आहेत. नागरिकांच्या विविध समस्यांना जाणून घेण्यासाठी आणि त्याला वाचा फोडणासाठी ते मतदारसंघातील सर्व जिल्ह्यात दौरा करत आहेत. आमदार सत्यजीत तांबे रविवारी जळगाव दौऱ्यावर येत असून ते विविध ठिकाणी भेटी देऊन मतदारांचे प्रश्न जाणून घेणार आहेत. आमदारकीला वर्षपूर्ती झाल्याने मतदारांचे आभार देखील मानणार आहेत.
आमदार सत्यजीत तांबे यांचा ११ ते १४ फेब्रुवारी असा चार दिवसाचा जळगाव दौरा असणार आहे. या चार दिवसाच्या दौऱ्यात आ. तांबे अमळनेर, चोपडा, धरणगाव, पाचोरा, एरंडोल, भडगाव, भुसावळ, रावेर, यावल आणि मुक्ताईनगर अशा अनेक ठिकाणी भेट देणार आहेत. या आमदारकीच्या एका वर्षातच विधान परिषदेतील एक युवा व अभ्यासू आमदार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे प्रयत्नशील असून जळगाव दौऱ्यात ते शिक्षक, विद्यार्थी, डॉक्टर, वकील तसेच युवा शेतकर्यांची भेट घेऊन समस्या जाणून घेणार आहेत.
आमदार म्हणून निवडून आल्यापासून ‘एक पाऊल महाराष्ट्राला महान राष्ट्र करण्याकडे’ नेण्यासाठी आ. सत्यजीत तांबेंचा कल आहे. निवडणुकीच्या काळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा आ. तांबेचा प्रयत्न होता. परंतु, ५ जिल्हे, ५४ तालुके आणि ४ हजार गावांपेक्षाही मोठ्या असलेल्या या मतदारसंघापर्यंत वैयक्तिकदृष्या पोहोचणे यावर मर्यादा होत्या. तरीही निवडणूक होताच जनतेच्या प्रश्नांचा मागोवा घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न आमदार सत्यजीत तांबे आपल्या दौऱ्या दरम्यान करत आहेत.