देशात सकारात्मक बदल घडविण्यासाठी प्रभावी माध्यम म्हणजे ‘मतदान’
– ‘राष्ट्रीय मतदार दिना’च्या निमित्ताने आ. तांबेंनी व्यक्त केल्या भावना
प्रतिनिधी, अहमदनगर
जगातील १२७ देशांपैकी ६४ देशांमध्ये लोकशाहीच्या माध्यमातून २०२४ या वर्षात निवडणूक होणार आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश आहे. देशात सकारात्मक बदल घडविण्यासाठी आपला नेता निवडून देणे म्हणजेच ‘मतदान’ होय. मतदान हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. आपला नेता निवडून देण्याच्या प्रक्रियेत म्हणजे मतदान करण्यात युवकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे, असा सल्ला तरुणाईला आमदार सत्यजीत तांबेंनी ‘राष्ट्रीय मतदार दिना’च्या निमित्ताने दिला.
२५ जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय मतदार दिन’ म्हणून साजरा केला जातो. तरुणाईला आपल्या मताचे महत्त्व पटवून देण्यासाठी आ. तांबेंनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सत्यजीत तांबे म्हणाले की, आपलं काही काम खासदार व आमदाराकडे नसतं म्हणून लोक मतदान करत नाहीत, परंतु, आपण ज्या घरात राहतो. त्यासाठी ठरवलेला जमिनीचा भाव, रस्ते, तसेच आपण पित असलेल्या पाण्याचा दर्जा आणि आपण राहत असलेल्या ठिकाणी असलेली महानगरपालिका, नगरसेवक, लोकप्रतिनिधी ठरवत असतात. वाढत्या प्रदुषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी धोरण सुद्धा सरकार तयार करत असतं. म्हणजेच अप्रत्यक्षरीत्या आपल्या दैनंदिन आयुष्यावर सरकारचं नियंत्रण आहे. म्हणून मतदान करुन आपलं सरकार निवडून देण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.
माझा राजकारणाशी संबंध नाही. मी मतदान करणार नाही, ही भूमिका घेऊन लोकं सुट्टीवर जातात; त्यांची मला कीव वाटते. ज्यांच्यासाठी ही लोकशाही उभारण्यात आली आहे. तेच लोक जर याबाबतीत गंभीर नसतील तर या देशाला कोणीही वाचवू शकणार नाही, असेही आ. सत्यजीत तांबेंनी सांगितले.
मतदानाचे महत्त्व लक्षात घ्या!
भारत लोकशाही प्रधान देश आहे. मात्र, देशातील मतदानाचा टक्का अत्यंत कमी असल्याने नागरिकांनी मतदान करावं. म्हणून राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. मतदान करण्याच्या प्रक्रियेत यंदा युवकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. देशाचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर मतदान करणे आवश्यक आहे.
………………………